जिल्ह्याला परतीच्या पावसाने तारले
By Admin | Updated: September 8, 2015 23:04 IST2015-09-08T23:04:51+5:302015-09-08T23:04:51+5:30
शेतकऱ्यांतून समाधान : आटपाडी, विटा, मिरज तालुक्यात जोरदार पाऊस

जिल्ह्याला परतीच्या पावसाने तारले
सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पिके वाया गेली आहेत. परंतु, परतीच्या पावसाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात हजेरी लावल्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मंगळवारी आटपाडी, पलूस, विटा, मिरज तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सांगली शहरातील सखल भागातही पाणीच पाणी साचून राहिले होते. जत, कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागातही पाऊस झाल्यामुळे तेथील टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे.
सकाळी ढगाळ वातावरण होते; पण हवेत उकाडाही जाणवत होता. दुपारी ढग दाटून आले आणि बाराच्या सुमारास सांगली शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास तासभर झालेल्या पावसाने शहरातील सखल भागामध्ये पाणी साचून राहिले होते. मिरज तालुक्यातील माधवनगर, बुधगाव, खंडेराजुरी, मालगाव, गुंडेवाडी परिसरातही पावसाने हजेरी लावली.आटपाडी तालुक्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस बरसला आहे. मंगळवारीही आटपाडी, दिघंची, राजेवाडी, गोमेवाडी, नेलकरंजी परिसरात पावसाच्या दमदार हजेरीने, दुष्काळाच्या धास्तीने हतबल झालेला बळिराजा काहीसा सुखावला आहे. खानापूर तालुक्यातील विटा शहरासह काही गावांमध्ये पाऊस झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग परिसरात दमदार पाऊस झाला आहे. पलूस तालुक्यातील बांबवडे, किर्लोस्करवाडी, आंधळी या परिसरात दमदार पाऊस झाल्याने खरीप पिकाला त्याचा फायदा होणार आहे. जत शहर, बिळूर, डफळापूर, दरीबडची व उमदी परिसरात शनिवारी रात्री तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे. (प्रतिनिधी)
संजयनगर परिसरात ४० घरांत पाणी---संजयनगर : सांगलीतील संजयनगर परिसराला मंगळवारी पावसाने झोडपले. यामुळे जगदाळे प्लॉटमधील सुमारे ४० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. मंगळवारी बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर सुमारे १ तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. जगदाळे प्लॉट, संजयनगर येथील सुमारे ४० घरांत पावसाचे पाणी शिरले. पावसाच्या पाण्याने घरांना वेढा दिला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दुसरीकडे लहान मुलांनी पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंद लुटला, तर जगदाळे प्लॉट, संजयनगर पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र पाणी साचून राहिले होते. अचानक पाऊस आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.