जि. प. जलव्यवस्थापन सभेला गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: December 10, 2014 23:47 IST2014-12-10T23:06:46+5:302014-12-10T23:47:01+5:30
अध्यक्षांचे आदेश : आटपाडीत पाणी योजना मंजूर

जि. प. जलव्यवस्थापन सभेला गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा
सांगली : जलव्यवस्थापन समिती सभेस गैरहजर राहणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी दिले. सभेत आटपाडी येथील जुन्या नळपाणी पुरवठा योजनेच्या दीड कोटीच्या कामास मंजुरी देण्यात आली.
आज, बुधवारी दुपारी जलव्यवस्थापन समितीची सभा होती. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभा सुरू झाल्यानंतरही सभेस नऊ गटविकास अधिकारी गैरहजर होते. याबाबत होर्तीकर यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. गटविकास अधिकारी गैरहजर असल्याबद्दल सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. मिरजेचे गटविकास अधिकारी सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने उपस्थित झाले. परंतु वेळेत उपस्थित न राहणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी नोटीस देण्याचा निर्णय घेतला.
सभेत आटपाडीसाठीच्या जुन्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटी ४७ लाख रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. सभेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, उज्ज्वला लांडगे, मनीषा पाटील आदींसह सदस्य, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)