जिल्ह्याला हस्ताच्या पावसाने झोडपले
By Admin | Updated: October 2, 2015 23:47 IST2015-10-02T23:47:03+5:302015-10-02T23:47:03+5:30
रब्बीच्या आशा पल्लवित : शहरातील सखल भागात पाणी; विद्युत पुरवठा खंडित

जिल्ह्याला हस्ताच्या पावसाने झोडपले
सांगली : पूर्वभाग वगळता सांगली-मिरज शहरांसह जिल्ह्याला मुसळधार पावसाने शुक्रवारी सायंकाळी झोडपून काढले. दुष्काळी जत तालुक्यात मात्र तुरळक पाऊस झाला. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्युतपुरवठा खंडित झाल्याने अनेक भागात अंधार पसरला होता. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने, रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. सुमारे तीन तास सरी कोसळत होत्या. सांगली शहरात शिवाजी पुतळा, मंडई, सिटी पोस्ट परिसरात पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. मिरजेत सखल भागात पाणी साचले होते. विद्युत तारा तुटून पडल्याने शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला. पावसामुळे मिरज पूर्वभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बेडग, आरग, नरवाड, म्हैसाळ, सोनी, भोसे, सलगरे, लिंगनूर, खटाव, कळंबी, मालगाव, एरंडोली, टाकळी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
विट्यासह खानापूर तालुक्याच्या काही भागात मध्यम, तर रात्री आठच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. खानापूर पूर्वभागातही पाऊस झाला. आळसंद, भाळवणी, ढवळेश्वर, कळंबी परिसरात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. माहुली, लेंगरे, नागेवाडी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विटा शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास दहा ते पंधरा मिनिटे पावसाने हजेरी लावली.
कडेगाव, कडेपूर, तडसर, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव परिसरासही पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी ओढे-नाले भरून वाहिले. खांबाळे पाटी (ता. कडेगाव) येथील सुर्ली ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने दुपारी चार ते सहापर्यंत विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील कऱ्हाड-विटा वाहतूक ठप्प होती. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, करगणी परिसरात सातच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. तासगाव शहरासह कवठेएकंद, मणेराजुरी परिसरास दोन ते तीन तास पावसाने झोडपून काढले. पूर्वभागातील सावळज, वायफळेतही जोरदार पाऊस झाला.
शिराळा, वाळवा तालुक्यांत संततधार
गेल्या दोन दिवसांपासून इस्लामपूर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी तुरळक हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी संपूर्ण वाळवा तालुक्यात संततधार धरली. रात्री आठपर्यंत हा पाऊस बरसत राहिला. पावसामुळे सोयाबीनची मळणी करणारा शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. जत शहर आणि परिसरात दुपारी दोनच्या दरम्यान तुरळक प्रमाणात पाऊस झाला.
शिराळा तालुक्यात शिराळासह सागाव, मांगले, शिरशी, कोकरूड, पुनवत परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. अनेक ठिकाणी भात काढणी बंद करावी लागली. कवठेमहांकाळ तालुक्यात रात्री सातच्या सुमारास अर्धा तास विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुची, करोली (टी), शिरढोण, देशिंग, हिंगणगाव, रांजणी, ढालगाव या परिसराला पावसाने झोडपले.