जिल्ह्यात पक्ष्यांच्या २९७ प्रजाती

By Admin | Updated: February 16, 2015 00:02 IST2015-02-15T23:16:43+5:302015-02-16T00:02:36+5:30

नागरीकरणाचा वाढता धोका : हिवाळ्यात होणार विदेशी पक्ष्यांचे आगमन

The district has 297 species of birds | जिल्ह्यात पक्ष्यांच्या २९७ प्रजाती

जिल्ह्यात पक्ष्यांच्या २९७ प्रजाती

नरेंद्र रानडे -सांगली -दिवसेंदिवस वाढते नागरीकरण, औद्योगिकरण, तसेच शेतीचे वाढत जाणारे क्षेत्र याचा विपरित परिणाम पक्ष्यांच्या राहणीमानावर होत आहे. पक्षीतज्ज्ञांनी केलेल्या पक्षीगणनेत जिल्ह्यात २९७ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत. परंतु लोकसंख्या वाढीमुळे भविष्यात सध्या असणारी पक्ष्यांची संख्या कमी होण्याचा धोका आहे. आतापर्यत शहरात वास्तव्य करणाऱ्या चिमण्यांनी शहरीकरणाचा त्याग करून ग्रामीण जीवन आपलेसे केल्याचेही पक्षीगणनेत आढळून आले आहे.
जिल्ह्यातील पक्षीतज्ज्ञांनी सांगली जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करून मागील वर्षी सविस्तर अहवाल तयार केला आहे. त्याला प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या जर्नलमध्ये यंदा स्थान मिळाले आहे. अहवाल तयार करताना मागील वीस वर्षांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला आहे. निरीक्षणात जिल्ह्यात देशी आणि विदेशी अशा मिळून २९७ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत. सुदैवाने आतापर्यंत पक्षांच्या प्रजातींच्या संख्येत घट आढळून आलेली नाही. असे असले तरीही सध्या सर्वत्र होत असलेल्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पक्ष्यांचे हक्काचे निवासस्थानच उद्ध्वस्त होत आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही. याचा धोका कालांतराने निर्माण होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरातील पक्षीगणना सुरू आहे.वन खात्यातर्फे ३० जानेवारी २०१४ आणि १ फेब्रुवारी २०१५ या दोन दिवसात चांदोली अभयारण्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. तेथे ६३ प्रजातींचे ४५० पक्षी आढळून आले आहेत. पूर्वीपेक्षा पाण्याचे साठे वाढत चालल्याने स्थलांतरित अर्थात विदेशी पक्ष्यांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील काही भागात वटवाघळांची संख्या लक्षणीय असली तरी, त्यांची अद्याप गणना झालेली नाही.


मोबाईल रेडीएशनचा परिणाम नाही
मोबाईलमधून निघणाऱ्या रेडीएशन लहरींमुळे चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे बोलले जात असले तरी, त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे अहवालाच्या माध्यमातून समोर आले आहे. विशेष म्हणजे जेथे मोबाईल टॉवर आहेत, त्या ठिकाणीदेखील चिमण्यांचे वास्तव्य आहे. परंतु शहरातील चिमण्या ग्रामीण भागाकडे वळत आहेत.


मनुष्यांनी त्यांच्या गरजा मर्यादित ठेवल्या, तर नागरिकीकरणाचा धोका टळू शकतो. आपल्या घराच्या परिसरात लॉन आणि शोभेची झाडे लावण्यापेक्षा प्रामुख्याने फळझाडांची लागवड तसेच पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
- शरद आपटे. पक्षीतज्ज्ञ. सांगली.

Web Title: The district has 297 species of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.