जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर ४ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST2021-08-24T04:31:16+5:302021-08-24T04:31:16+5:30
सांगली : निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील कोरोनाची लाट ओसरत आहे. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी दिलासादायक आहे. एप्रिलमध्ये १९ ...

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर ४ टक्क्यांवर
सांगली : निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील कोरोनाची लाट ओसरत आहे. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी दिलासादायक आहे. एप्रिलमध्ये १९ टक्क्यांवर असणारा कोरोना पॉझिटिव्हिटी दर आता ४ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. याशिवाय मृत्यूदरातही कमालीची घट झाली आहे.
जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. एप्रिलमध्ये ही लाट उच्चतम स्तरावर पोहोचली होती. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांच्या घरात होता. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोविड रुग्णालये, सेंटर्स भरले होते. काही दिवस बेड मिळणेही मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीतून जिल्हा आता बाहेर पडत आहे. लाट सुरू झाल्यानंतर तब्बल सहाव्या महिन्यात ती ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध व्यावसायांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या वाढण्याची भीतीही होती. मात्र, रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
चौकट
तारीख पॉझिटिव्हिटी दर मृत्यूदर
२३ एप्रिल १९.४६ ३.०४
२३ मे १७.४८ २.८९
२३ जून ८.५२ २.८४
२३ जुलै ६.२५ २.६५
२३ ऑगस्ट ४.०९ २.६२
चौकट
विभागनिहाय सध्याचा मृत्यूदर
ग्रामीण २.४४ टक्के
शहरी २.८५
महापालिका ३.०७
चौकट
नियमांचे पालन अत्यावश्यक
निर्बंध शिथिल केल्यानंतरही कोरोनाची लाट ओसरत असली तरी सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर या गोष्टी पाळणे आवश्यक आहे. सध्या विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाईसुद्धा रेंगाळल्यामुळे नियमांबाबत नागरिकांमध्ये गाफिलपणा दिसत आहे. लाट पूर्णपणे ओसरण्यास अद्याप वेळ असल्याने आणखी काही दिवस सतर्कता बाळगावी लागणार आहे.
चौकट
सणांचा काळ अधिक काळजीचा
सध्या श्रावणात व त्यानंतरही तीन महिने मोठे सण आहेत. त्यावेळी बाजारपेठांमध्ये गर्दी हाेण्याची शक्यता आहे. या सणांमधील स्थितीबाबत सध्या प्रशासनाला चिंता वाटत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांनी दक्षतेचे आवाहन केले आहे.