जिल्ह्यातील उमेदवारांचा मतदारसंघातच तळ!

By Admin | Updated: October 17, 2014 22:53 IST2014-10-17T21:43:32+5:302014-10-17T22:53:25+5:30

आभार दौरे सुरू : व्हॉट्स अपच्या माध्यमातून आभार मानण्याचे काम; निकालानंतर जाणार पर्यटनाला

District candidates in the constituency! | जिल्ह्यातील उमेदवारांचा मतदारसंघातच तळ!

जिल्ह्यातील उमेदवारांचा मतदारसंघातच तळ!

सांगली : विधानसभेसाठी एकदाचे मतदान झाले, आता रविवारी निकाल. त्यामुळे दोन दिवस कुटुंबासाठी देण्यावर, सहकारी संस्था, उद्योगात लक्ष घालण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. बहुतांश जणांनी पर्यटनाला फाटा देऊन मतदारसंघातील गावांना भेटी देऊन आभाराचे दौरे सुरू केले आहेत. आभार दौऱ्यांच्या निमित्ताने आकडेमोडही सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गेले सहा महिने ही मंडळी व्यस्त होती. काहीजण सोळा-सोळा तास कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. मतदानापूर्वी पंधरा दिवस तर पाच ते सहा तासही झोप मिळाली नाही. बुधवारी मतदान झाल्यानंतर मात्र सर्वच उमेदवार ‘रिलॅक्स’ झाल्याचे दिसत आहे.
लक्षवेधी मतदारसंघ म्हणून पलूस-कडेगावची राज्यभर ओळख आहे. येथे काँग्रेसचे पतंगराव कदम आणि भाजपचे पृथ्वीराज देशमुख अशीच लढत होती. या मतदारसंघात सहा महिन्यांपासून निवडणुकीची धामधूम सुरू होती. आता मतदानानंतर दोघेही मतदारांचे आभार मानण्यात व्यस्त आहेत. माजी वनमंत्री पतंगराव कदम मतदानानंनतर मतदारसंघातच होते. शुक्रवारी ते संस्थेच्या कामानिमित्त पुण्याला गेले. पृथ्वीराज देशमुख साखर कारखान्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन दुपारनंतर मतदारसंघातील गावांच्या दौऱ्यावर त्यांचा भर आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघाकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या शुक्रवारच्या दिवसाची सुरुवात कार्यकर्त्यांच्या कामानेच झाली. मतदारांच्या समस्या सोडविण्यावर त्यांचा भर होता. कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या टक्केवारीसह, कोठे कसे मतदान झाले याचाही त्यांनी कानोसा घेतला. भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे हेसुध्दा मतदारसंघातच आहेत. तेही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत.
शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक शुक्रवारी सकाळी सातपासूनच चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास साखर कारखान्याच्या कामात व्यस्त होते. कारखान्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गळीत हंगामाच्या तयारीविषयी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील काही गावांना भेट देऊन मतदारांचे आभार मानले.
भाजपचे उमेदवार माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनीही मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मतदारांचे आभार मानले.
सांगली विधानसभा मतदारसंघातील पृथ्वीराज पवार, सुधीर गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतमोजणीची तयारी केली. सुरेश पाटील मात्र कुटुंबात रमले होते. मदन पाटील कामानिमित्त मुंबईला गेले आहेत. मिरज मतदारसंघातील उमेदवारही कार्यकर्त्यांच्या गप्पात व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)

मतमोजणीसाठी नेत्यांची तयारी
खानापूर-आटपाडीतील शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख, काँग्रेसचे सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर यांनीही आज कार्यालयात बसूनच मतदानाच्या टक्केवारीवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. निवडणुकीत मतदान केलेल्या सर्व मतदारांचे व्हॉट्स अपच्या माध्यमातून आभार मानले जात आहेत. दिवसभर विविध कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेऊन, मतदान कसे झाले, कोठे काय परिस्थिती होती याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. दुपारी थोडावेळ विश्रांती घेऊन निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा हिशेब देण्यात ते व्यस्त होते. रविवारी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीवर चर्चा रंगली होती. मतमोजणीच्या नियोजनाच्यादृष्टीने तयारी केली आहे. कार्यकर्ते कोठे असतील, त्यांची ओळखपत्रे आदी नियोजन दिवसभर चालू होते. अपक्ष सुभाष पाटील यांनी आज दिवसभर विसापूर मंडलमधील कार्यकर्ते, मतदारांच्या भेटी घेऊन आभार मानले. तेही आकडेमोडीत व्यस्त होते.

उमेदवारांचे विजयाचे गणित
जतमध्ये मतदानानंतर प्रमुख उमेदवारांनी ग्रामीण भागातून समर्थकांना बोलावून घेऊन आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे उमेदवार विलासराव जगताप विश्वासू कार्यकर्त्यांकडे दूरध्वनीवरून आणि भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडे चौकशी करीत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश शेंडगे अद्याप जत येथे आहेत. गुरुवारी दुपारी मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी त्यांची मते अजमावली. काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांनी तालुक्यातील प्रत्येक गटात एक कार्यकर्ता पाठवून व विश्वासू कार्यकर्त्याला बोलावून घेऊन आकडमोडीस सुरुवात केली आहे.

Web Title: District candidates in the constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.