सांगली : जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांनी सहकारी साखर कारखानदारीवर प्रचंड कृपादृष्टी दाखविली. कर्जवाटप करताना त्यांनी प्रशासकीय टिपणी, नियम, कर्जदाराची आर्थिक स्थिती याचा कोणताही विचार केला नाही. राज्य सहकारी बँकेला तारण असलेल्या जत येथील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यात आला. आता कारखान्याच्या ५ कोटी ८६ लाखाच्या थकबाकीला कोणतेही तारण उरलेले नाही. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीत तत्कालीन संचालकांनी मुक्तहस्ते कर्जवाटप केले. कार्यालयीन मंजुरी नसताना, तारण मालमत्ता राज्य शासनाकडे असताना आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अशा कारखान्यांना कर्जवाटप करण्याचे धाडस माजी संचालकांनी केले. जत येथील साखर कारखान्याच्याबाबतीत अशीच चूक करण्यात आली. या कारखान्याला राज्य सहकारी बँकेनेही कर्जपुरवठा केला होता. त्यामुळे थकित कर्जासाठी राज्य बँकेने संपूर्ण कारखान्याची मालमत्ता ४७ कोटी ८६ लाखांना विकली. जिल्हा बँकेला त्यांच्या कर्ज थकबाकीपोटी केवळ १ कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले. उर्वरित १ कोटी ४९ लाखाला आता कोणतेही तारण उरलेले नाही. या कारखान्यास १९ जुलै १९९९ रोजी २ कोटी, ९ सप्टेंबर २00२ रोजी ५0 लाख, २३ नोव्हेंबर २00२ रोजी १ कोटी ५0 लाख मंजूर करून ते वितरित केले. वास्तविक या कारखान्याला कर्जपुरवठा करणाऱ्या राज्य बँकेची परवानगी जिल्हा बँकेने घेणे गरजेचे होते. अशी परवानगी न घेताच संचालक मंडळाने स्वत:च्या जबाबदारीवर कर्जवाटप केले. कर्जास कार्यालयाचीही शिफारस नव्हती. त्यामुळे ४ कोटी ३७ लाखाचे नुकसान जिल्हा बँकेला झाले. एकूण ५ कोटी ८६ लाख रुपयांच्या नुकसानीपोटी जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांना आता जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. विनातारण व कार्यालयाची शिफारस विचारात न घेता नियमांचे बंधन न पाळता साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्यात आला. त्यामुळे संचालकांची ही ‘कर्जदार हिताय’ कृती संचालकांच्याच अंगलट आली आहे. याशिवाय बँकेचेही अशा निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात जतच्या कारखान्याचे हे प्रकरणही तितकेच गंभीर आहे. चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी संबंधितांवर ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)यांना ठरविले जबाबदार आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, विलासराव शिंदे, मोहनराव कदम, प्रा. सिकंदर जमादार, मदन पाटील, विजय सगरे, जगन्नाथ म्हस्के, दिनकर पाटील, अमरसिंह नाईक, शिवराम यादव, बी. के. पाटील, महावीर कागवाडे, मंगल शिंदे, मीनाक्षी शिंदे, अनिता वग्याणी आदींना जबाबदार धरण्यात आले आहे.
‘कर्जदार हिताय’मुळे जिल्हा बँक आली गोत्यात
By admin | Updated: September 4, 2015 22:25 IST