जिल्हा बॅँक गैरव्यवहार; २३ ला सुनावणी
By Admin | Updated: January 2, 2015 00:06 IST2015-01-01T23:03:47+5:302015-01-02T00:06:32+5:30
अधिकाऱ्यांनाही नोटीस : चार कोटी १८ लाखांचा घोटाळा

जिल्हा बॅँक गैरव्यवहार; २३ ला सुनावणी
सांगली : जिल्हा बँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी येत्या २३ जानेवारीला सुनावणी होणार आहे. चौकशी अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी माजी संचालक व अधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजाविल्या आहेत.
बँकेचे २००१-२००२ ते २०११-१२ या कालावधीतील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण चार्टर्ड अकौंटंट डी. ए. चौगुले यांनी केले असून, त्याचा अहवाल त्यांनी कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांकडे २ मे २०१३ रोजी सादर केला होता. या अहवालात अनेक नियमबाह्य कामांवर ताशेरे ओढण्यात आले होते.
यामध्ये बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम, दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नियमबाह्य नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले नियमबाह्य मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला नियमबाह्य पगार खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. या अहवालात चार कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले.
या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांची नियुक्ती केली आहे. कोल्हापुरे यांनी नुकतेच माजी संचालक व अधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजाविल्या आहेत.
आता या नोटिसींवर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी संचालक व अधिकारी आपले म्हणणे मांडू शकतात. याकडे जिल्हा बँक अधिकारी व माजी संचालकांचे लक्ष लागू राहिले आहे. (प्रतिनिधी)
जबाबदारी निश्चित
या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांची नियुक्ती केली आहे.