‘ब्रेक द चेन’साठी जिल्हा प्रशासन रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:54+5:302021-04-06T04:25:54+5:30
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी रात्री आठपासून लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. ...

‘ब्रेक द चेन’साठी जिल्हा प्रशासन रस्त्यावर
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी रात्री आठपासून लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. शासनाने जारी केलेल्या नियमावलीबाबत मात्र, संभ्रमच अधिक दिसून आला. तरीही ‘वीकएंड लॉकडाऊन’ आणि इतर दिवशी निर्बंधासाठी सोमवारी दिवसभर प्रशासनाकडून नियोजन सुरू होते. रात्री आठनंतर रस्त्यावर उतरत पोलिसांनी संचारबंदीबाबत नागरिकांना माहिती दिली.
राज्य शासनाने सोमवार रात्रीपासून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी आदेश लागू करत इतर वेळेतही कडक निर्बंध लागू केले आहेत. शनिवारी व रविवारी पूर्णत: लॉकडाऊन असणार आहे. याबाबतचे आदेश आल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच प्रशासनाने नियोजन सुरू केले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत दिवसभर जमावबंदी तर रात्री संचारबंदीसह कोणती दुकाने चालू राहणार, कोणती पूर्णत: बंद राहणार याबाबतच्या सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवण्याबराेबरच पोलीस कर्मचाऱ्यांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, रात्री आठनंतर कोणीही बाहेर पडणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
सोमवारी रात्री आठनंतर पोलिसांनी शहरात निर्बंधाबाबत सूचना देण्यास सुरुवात केली. संचारबंदीचा पहिलाच दिवस असल्याने प्रमुख चौकात थांबून पोलीस सूचना देत होते.
चौकट
संभ्रमच अधिक
शासनाने रात्रीच्या संचारबंदीसह इतर वेळेत जमावबंदीचे आदेश दिले याबरोबरच कोणती दुकाने, व्यवसाय सुरू राहतील व कोणते पूर्णत: बंद राहतील याबाबतही सूचना दिल्या आहेत. तरीही नागरिकांत मोठा संभ्रम होता. त्यामुळे प्रशासनाने याबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली.
कोट
जिल्ह्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी होणार आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनीही सहकार्य करावे. अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडणे टाळावे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
कोट
शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे जिल्ह्यात पालन करण्यात येणार आहे. रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. नागरिकांना त्रास न देता सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक