आनंदराव नाईक पुरस्काराचे २ सप्टेंबर राेजी वितरण : राम पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:35+5:302021-08-26T04:28:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे २ सप्टेंबर राेजी देशभक्त आनंदराव नाईक यांची ११९ वी ...

आनंदराव नाईक पुरस्काराचे २ सप्टेंबर राेजी वितरण : राम पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे २ सप्टेंबर राेजी देशभक्त आनंदराव नाईक यांची ११९ वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त ‘देशभक्त आनंदराव नाईक गुणवता पुरस्काराचे’ वितरण साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती विश्वास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, देशभक्त आनंदराव नाईक यांच्या कार्याचे सदैव स्मारण रहावे, यासाठी दरवर्षी गुणवत्ता पुरस्काराचे वितरण करण्यात येते. वितरण सोहळा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, आनंदराव नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष, माजी सभापती सम्राटसिंग नाईक उपस्थित असतील. कार्यक्रम कारखाना स्थळावरील गणेश मंदिराशेजारील चिंतन मंडपात सकाळी ११ वाजता काेराेनाचे सर्व नियम पाळून होईल.
पाटील म्हणाले, पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती पदकविजेते पाेलीस उपनिरीक्षक डी. आर. पाटील (चिंचोली), सेंट्रलचे पाेलीस उपअधीक्षक तुषार गावडे (मांगले), उपनिरीक्षक मानसिंग खबाले (शिराळा), पीएच. डी. मिळविलेले गुणवंत सुनील गायकवाड व दत्तात्रय पाटील (दोघे शिराळा), प्रवीण पाटील (मांगले) व सागर मोहिते (सांगाव) यांना ‘आनंदराव नाईक विशेष गुणवता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. दहावी शालांत परीक्षेत तालुक्यात प्रावीण्य मिळविलेले पहिले तीन विद्यार्थी तसेच, बारावी परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत तालुक्यात प्रावीण्य मिळविलेले अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना आनंदराव नाईक गुणवता पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.