जिल्ह्यात ७० हजार टन बेदाणा पडून
By Admin | Updated: November 9, 2016 00:49 IST2016-11-09T00:49:11+5:302016-11-09T00:49:11+5:30
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : किलोला ८० ते ११० रुपये दर; सौद्यावेळी चांगल्या दराची अपेक्षा

जिल्ह्यात ७० हजार टन बेदाणा पडून
अशोक डोंबाळे ल्ल सांगली
मागील दोन वर्षांत बेदाण्यास किलोला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळाल्यामुळे फेबु्रवारी २०१६ च्या हंगामात द्राक्ष बागायतदारांनी बेदाण्याचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेतले. जिल्ह्यात एक लाख ६० हजार टन बेदाणा तयार झाला आणि मागील हंगामातील तीस हजार टन बेदाणा शिल्लक राहिला. यापैकी एक लाख २० हजार टन बेदाण्याची विक्री झाली असून, दर नसल्यामुळे सध्या ७० हजार टन बेदाणा शीतगृहामध्ये पडून आहे. सध्या एक किलो बेदाण्यास ८० ते ११० रुपयापर्यंतच दर मिळत असून, यातून उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात एक लाख एकरहून अधिक द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. यापैकी एक हजार एकर क्षेत्रातील द्राक्षांची दरवर्षी निर्यात होते. उर्वरित द्राक्षापैकी बहुतांशी द्राक्षांपासून बेदाणा तयार केला जातो. द्राक्षाच्या प्रत्येक हंगामामध्ये एक ते दीड लाख टन बेदाणा जिल्ह्यात तयार होतो. मागील दोन वर्षांत बेदाण्यास विक्रमी दीडशे ते दोनशे रुपये किलो दर मिळाला. द्राक्षाची विक्री करण्यापेक्षा बेदाण्याचे पैसे जादा होतात, अशी शेतकऱ्यांची समजूत झाली. यातूनच शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च २०१६ च्या हंगामामध्ये जिल्ह्यात एक लाख ६० हजार टन बेदाणा तयार केला. जुना बेदाणा तीस हजार टन शिल्लक होता. यापैकी एक लाख २० हजार टन बेदाण्याची वर्षभरात विक्री झाली. शेतकऱ्यांनी आज ना उद्या दर मिळेल, म्हणून बेदाणा शीतगृहामध्ये ठेवला होता. पण, दिवाळी संपली तरीही प्रति किलो बेदाण्याचा दर ८० ते १२० रुपयाच्या पुढे गेलाच नाही. सध्या चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास प्रति किलो १०० ते ११० रुपयेच दर मिळत आहे.
दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील व्यापारी सांगलीतील बेदाण्याची मोठ्या प्रमाणात दरवर्षी खरेदी करून निर्यात करतात. बहुतांशी व्यापारी दिवाळीदरम्यान बेदाण्याची जादा खरेदी करत असल्याचे आजपर्यंत अनुभव आहे. परंतु, यावर्षी बाहेरील राज्यातील व्यापारी बेदाणा खरेदीसाठी कमी प्रमाणात आले. त्यांनीही पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात खरेदी केली. येथील बाजारपेठेत सध्या बेदाण्याची उलाढाल स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनच होत आहे. म्हणूनच बेदाण्याचे दर कमी झाले आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. बेदाणा तयार करून सहा महिने झाले, तरीही दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मिळेल त्या दराने बेदाण्याची विक्री करीत आहे.
उत्पादन खर्चही त्यांच्या पदरात पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नवीन द्राक्षबागांसाठी औषध फवारणीसह अन्य खर्चासाठी त्यांना पैशाची गरज आहे. यामुळे मिळेल त्या दराने शेतकरी बेदाण्याची विक्री करीत आहेत. तरीही जिल्ह्यात ७० हजार टन बेदाणा सध्या शीतगृहामध्ये पडून आहे. यामुळे भविष्यातही बेदाण्याचा दर वाढेल, अशी अपेक्षा दिसत नाही. हिरवा आणि पिवळ्या बेदाण्यालाच दर बरा मिळत आहे. काळ्या बेदाण्यास तर ४० ते ५० रुपये किलो दर मिळत आहे. बेदाण्याचे सौदे दि. १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. यावेळी तरी बेदाण्यास चांगला दर मिळेल का?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
व्यापाऱ्यांकडूनही : बेदाणा उत्पादकांची लूट
शीतगृहात प्रतिकिलो ३५ पैसे महिन्याला बेदाणा उत्पादकांना द्यावे लागत आहेत. बाजारपेठेत बेदाणा विक्रीसाठी आणल्यानंतर २१ दिवसात पैसे शेतकऱ्यांना हवे असतील तर व्यापारी त्यांच्याकडून दोन टक्के व्याज घेत आहेत. बेदाण्यात तूट दाखविली जात असून, तेथेही शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होत आहे. द्राक्षबागायतदारांच्या या समस्येकडे संघटना लक्ष कधी देणार?, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यात व कर्नाटक सीमाभागातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी बेदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे. जागतिक मंदी आणि सरकारच्या धोरणामुळे बेदाण्याचे व्यवहार म्हणावे तेवढे झाले नाहीत. दिवाळीमध्ये बेदाण्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. ती यावर्षी झालीच नाही. दिल्ली, हरियाणा येथून व्यापारी आलेच नसल्यामुळे बेदाण्याचे दर किलोला ८० ते ७० रुपयांनी उतरले आहेत. सांगली मार्केट यार्डात सध्या चांगल्या बेदाण्याचा एक किलोचा दर ८० ते ११० रुपयेच आहे.
- अनिकेत घुळी, बेदाणा उत्पादक, मिरज.