प्राथमिक शाळांना पाठ्यपुस्तके वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:40+5:302021-09-16T04:32:40+5:30
ओळी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांत पाठ्यपुस्तके वितरण करण्याचे निवेदन शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना देण्यात आले. लोकमत ...

प्राथमिक शाळांना पाठ्यपुस्तके वाटप करा
ओळी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांत पाठ्यपुस्तके वितरण करण्याचे निवेदन शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तालुकास्तरावर पाठवलेली पाठ्यपुस्तके महिनाभरापासून वाटप न करताच पडून आहेत. ही पाठ्यपुस्तके तत्काळ शाळांवर वितरित करावी, अशी मागणी शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया राबवली, त्यामुळे खासगी इंग्रजी माध्यमाकडील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे पहिली व दुसरीचा पटही वाढलेला आहे. महिनाभरापासून पाठ्यपुस्तके पडून आहेत. त्याचे तत्काळ वितरण करावे अशी मागणी करण्यात आली. या वेळी शिक्षणाधिकारी कांबळे यांनी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचे आदेश दिले. तसेच, विज्ञान विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही सुरू असून, विज्ञान विषय शिक्षकांना लवकरच वेतन श्रेणी देऊ अशी ग्वाही दिली.
या वेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, अरुण पाटील, बाजीराव पाटील, अशोक महिंद, धनंजय नरुले, संजय काटे, संजय महिंद, नितीन चव्हाण, संतोष जगताप, प्रदीप पवार, वसंत शिनगारे उपस्थित होते.