महापालिका गटनेता निवडीवरून नाराजीनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:34+5:302021-02-05T07:22:34+5:30

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेतेपदावरून बुधवारी नगरसेवकांच्या बैठकीत नाराजीनाट्य रंगले. उपमहापौर आनंदा देवमाने यांनी अनुभवी नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्याची ...

Dissatisfaction with the selection of Municipal Group Leader | महापालिका गटनेता निवडीवरून नाराजीनाट्य

महापालिका गटनेता निवडीवरून नाराजीनाट्य

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेतेपदावरून बुधवारी नगरसेवकांच्या बैठकीत नाराजीनाट्य रंगले. उपमहापौर आनंदा देवमाने यांनी अनुभवी नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्याची मागणी करीत पक्षश्रेष्ठींनी बंद लिपाफ्यातून दिलेल्या नावाला जोरदार विरोध केला. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते. अखेर नवख्या नगरसेवकाला गटनेतेपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने देवमाने यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडीत ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपचे नगरसेवक युवराज बावडेकर यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने नव्या नेता निवडीसाठी बुधवारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला आ. गाडगीळ, आ. सुरेश खाडे, कोअर कमिटीचे सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह पक्षाचे ४३ नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीत उपमहापौर देवमाने यांनी नवख्या नगरसेवकांवर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यास विरोध केला. भाजपकडे स्वाती शिंदे, भारती दिगडे, अनारकली कुरणे यांच्यासारख्या अनुभवी नगरसेवकाला गटनेता करा. महापालिकेचे कामकाज माहीत नाही, अशा सदस्याला गटनेता करून काय उपयोग? अडीच वर्षांत काय केले? पुढील निवडणुकीत जनतेसमोर जाण्यासही तोंड नाही. चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रवेशावेळी मला व शिवाजी दुर्वेला शब्द दिला होता. दुर्वेचा तर चेंडू केला आहे. तुम्ही शब्द पाळू शकत नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.

यावर दोन्ही आमदारांसह कोअर कमिटीचे सदस्यही आवाक्‌ झाले. मकरंद देशपांडे यांनी पक्षश्रेष्ठींकडून नाव आले आहे, असे सांगून विषय थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावरही देवमाने भडकले. सर्व सदस्यांचे मत ऐकून निर्णय घ्या. तुम्ही वरून आणलेले नाव चालणार नाही. तुम्ही आणलेले नाव आम्ही स्वीकारणार नाही, असे म्हणताच बैठकीतील वातावरण तापले. अखेर देवमाने यांनी माझ्या मनाला पटेल तेच करणार, असे म्हणून बैठकीवर बहिष्कार टाकला. देवमाने यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौरपदाची निवड होणार आहे. या निवडीवेळी देवमाने भाजपला धक्का देण्याची शक्यता आहे.

चौकट

उपमहापौर देणार धक्का?

महापालिकेत भाजपचे काट्यावरचे बहुमत आहे. त्यात उपमहापौर देवमाने यांनी वेगळी भूमिका घेतल्यास भाजपला धक्का बसू शकतो. देवमाने यांच्यासोबत चार ते पाच नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. त्यात उपमहापौरांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची तयारी चालविल्याचे समजते. त्यामुळे आगामी महापौर निवडीवेळी भाजपला सावध पावले टाकावी लागणार आहेत.

Web Title: Dissatisfaction with the selection of Municipal Group Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.