थकीत बिलामुळे हुपरी पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत; पाण्यासाठी धावाधाव
By Admin | Updated: March 30, 2016 00:14 IST2016-03-29T23:34:12+5:302016-03-30T00:14:25+5:30
अडीच कोटी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या ग्रामपंचायतीला वार्षिक ३० ते ३५ लाखांच्या वीज बिलासाठी तरतूद कशी करता येत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

थकीत बिलामुळे हुपरी पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत; पाण्यासाठी धावाधाव
हुपरी : सहा लाख रुपयांच्या थकीत वीज बिल रकमेच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने हुपरी (ता. हातकणंगले)च्या नळ पाणीपुरवठा योजनेचा विद्युतपुरवठा बंद केल्याने गावचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. परिणामी, उन्हाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. हुपरीला पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी भारत निर्माण योजनेतून १४ कोटी रुपये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना राबविली आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होताच योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही संथ सुरू आहे. शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविली. मात्र, या योजनेच्या वीज बिलाची तरतूद ग्रामपंचायत प्रशासन ज्या त्यावेळी करीत नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. गेल्या जुलै ते डिसेंबरमधील १२ लाख ५० हजार रुपये वीज बिलाची थकबाकी आठ दिवसांपूर्वीच तेही १४ व्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या रकमेतून भरली असतानाच जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यांचे सहा लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे सोमवारी दुपारी महावितरण कंपनीने योजनेचा वीजपुरवठा तोडला. अडीच कोटी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या ग्रामपंचायतीला वार्षिक ३० ते ३५ लाखांच्या वीज बिलासाठी तरतूद कशी करता येत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत पाणी बंद होत नाही, तोपर्यंत कोणीही लक्ष देत नाही, असा अनुभव आहे. (वार्ताहर)
यापूर्वीची साडेबारा लाख रुपयांची थकबाकी भरली आहे. शहरातूनही तेवढी वसुली न झाल्याने वीज बिल भरायचे राहिले होते. त्याची पूर्तता केली जात असतानाच महावितरण कंपनीने वीजपुरवठा तोडला. योजनेसाठी एक नवीन विद्युत पुरवठा घेण्यात येत असून, थकबाकीही भरणार आहोत. जास्त वेळ पाणीपुरवठा बंद राहणार नाही, याची काळजी घेत आहोत.
- दीपाली शिंदे, सरपंच, हुपरी