इस्लामपुरात टोळक्याची घरात घुसून नासधूस
By Admin | Updated: February 16, 2015 23:12 IST2015-02-16T21:56:31+5:302015-02-16T23:12:33+5:30
दरोड्याचा गुन्हा : सोन्याचे दागिने, ११ हजार पळविले

इस्लामपुरात टोळक्याची घरात घुसून नासधूस
इस्लामपूर : किरकोळ कारणावरून झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून येथील नवनाथ नगरातील एका घरात घुसून १५ ते २० जणांच्या टोळक्याने घरातील साहित्याची नासधूस केली. मोटारसायकली फोडल्या. यामध्ये टोळक्याने सोन्याची चेन, मणी मंगळसूत्र असे दागिने हिसकावत ११ हजारांची रोकड पळवल्याची घटना घडली. हल्ल्याचा हा प्रकार रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडला. पोलिसांनी याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा नोंद केला आहे.या घटनेबाबत दीपक दिनकर नाथगोसावी (वय २२, रा. नवनाथनगर, इस्लामपूर) याने पोलिसांत रात्री उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी तानाजी मच्छिंद्रनाथ नाथगोसावी, अंकुर तानाजी नाथगोसावी, मुजीमील शेख, वैभव पाटील, सोनम शिंदे, गुरू जाधव यांच्यासह १५ ते २० जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दीपक नाथगोसावी याने कवठेपिरान (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या यात्रेत खेळण्यांचे दुकान लावले आहे. सकाळी ८ वाजता तो दुकानात गेला. त्यानंतर काही वेळाने त्याच्या भावकीतील तानाजी नाथगोसावी हा तेथे दारू पिऊन आला. त्याने दीपकला शिवीगाळ करून त्याच्याशी बाचाबाची केली. त्यावर दीपक हा दुपारी तेथून निघून इस्लामपूरला आला. त्याने ही घटना समाजाच्या अध्यक्षाच्या कानावर घातली. त्यांनी समेट घडविण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, तानाजी नाथगोसावी याने मोबाईलवरून दीपकने शिवीगाळ केल्याची माहिती मुलगा अंकुर याला दिली. अंकुरने दीपक याला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत दमदाटी केली. तेथून पुन्हा रागात असणाऱ्या वडिलांसह आपल्या मित्रांना बोलावून रात्री ९ च्या सुमारास दीपक नाथगोसावी याच्या घरावर हल्ला चढवला. घरासमोरील दोन मोटारसायकलींची मोडतोड करून मारहाण सुरू केली. या हल्ल्यानंतर घाबरलेले दीपकचे कुटुंबीय घरात जात असताना या टोळक्याने घरात घुसून नासधूस केली. तसेच दीपकच्या भावाच्या गळ्यातील सोन्याची चेन, वहिनीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. घरातील खेळणी, ११ हजारांची रोकडही लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर