सांगलीत शिवप्रतिष्ठानमधील वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:41+5:302021-02-07T04:24:41+5:30
सांगली : राज्यभर विस्तारलेली व प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारी शिवप्रतिष्ठान संघटना आता कार्यवाह पदावरील कार्यकर्त्याच्या निलंबन कारवाईमुळे चर्चेत आली ...

सांगलीत शिवप्रतिष्ठानमधील वाद चव्हाट्यावर
सांगली : राज्यभर विस्तारलेली व प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारी शिवप्रतिष्ठान संघटना आता कार्यवाह पदावरील कार्यकर्त्याच्या निलंबन कारवाईमुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यवाह नितीन चौगुले यांना निलंबित केल्यामुळे संघटनेतील वाद समोर आला आहे.
शिवप्रतिष्ठान संघटनेची व्याप्ती मोठी आहे. राज्यातील मोठी हिंदुत्ववादी संघटना म्हणून ती परिचित आहे. गेल्या काही महिन्यांपासून या संघटनेत वाद धुमसत होता. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन चौगुले संघटनेच्या प्रत्येक उपक्रमांत अग्रभागी होते. संस्थापक संभाजीराव भिडे यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते परिचित होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याबद्दल अंतर्गत तक्रारी सुरू झाल्या होत्या. कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार त्यांना संघटनेतून निलंबित केले आहे.
चौगुले यांच्याबद्दल नेमक्या तक्रारी काय होत्या, याबद्दल संघटनेकडून फारसा खुलासा करण्यात आलेला नाही. तरीही, या कारवाईबाबत चौगुले व त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका बाजूला कारवाईचे समर्थन, तर दुसऱ्या बाजूला चौगुले यांच्या समर्थकांकडून कारवाई मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी गावभागात चौगुले यांच्या समर्थकांनी कारवाई मागे घ्यावी म्हणून भिडे यांना विनंती केली होती. भिडे यांनी कारवाईवर ठाम राहण्याची भूमिका घेतली. संघटनेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे शिवप्रतिष्ठान चर्चेत आली आहे.
कोट
संभाजीराव भिडे गुरुजींनी ही कारवाई केली आहे. चौगुले यांच्याबद्दल दोन वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्यामुळे कारवाई झाली आहे. त्यांना संघटनेतून निलंबित केले आहे.
- रावसाहेब देसाई, अध्यक्ष, शिवप्रतिष्ठान
कोट
आजवर निष्ठेने, ताकदीने संघटनेसाठी २० वर्षे काम केले. शरजील उस्मानी याच्याविरोधात आंदोलन केले म्हणून कारवाई झाली का, अशी शंका मला वाटत आहे. कारवाईचे स्पष्ट कारण दिलेले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्याविरुद्ध संघटनेत कारस्थान सुरू आहे. याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
- नितीन चौगुले, सांगली