शहर राष्ट्रवादीत स्वयंघोषित नेत्यांवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:13+5:302021-09-15T04:32:13+5:30
सांगली : शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांत राजकीय वाद उफाळून आला आहे. युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार ...

शहर राष्ट्रवादीत स्वयंघोषित नेत्यांवरून वाद
सांगली : शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांत राजकीय वाद उफाळून आला आहे. युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्यावर स्वयंघोषित नेत्याचा आरोप करीत त्यांचे पक्षवाढीसाठी योगदान काय, असा सवाल जमीर रंगरेज यांनी केला. त्यांच्या आरोपाला राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर देत पवार यांची बाजू उचलून धरली. पवार-रंगरेज यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असलेल्या जमीर रंगरेज यांनी राहुल पवार यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. पवार स्वयंघोषित नेते असून आलिशान गाड्यांतून फिरण्यापलीकडे त्यांचे पक्षासाठी काहीच योगदान नाही. प्रभाग एकमध्ये पवार यांची लुडबुड सुरू आहे. आम्हाला घरात नगरसेवक पद असतानाही विश्वासात घेतले जात नाही. त्यांच्याकडून कुरघोड्या सुरू आहेत. पवार यांनी महापालिका क्षेत्रातील कोणत्याही एका प्रभागातून निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. पवार यांच्या कुरघोड्या थांबल्या नाही तर रईसा रंगरेज यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा जयंत पाटील यांच्याकडे देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
रंगरेज यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली. मंगळवारी शुभम जाधव, अजिंक्य पाटील, सॅमसन तिवडे यांच्यासह विविध सेलच्या पदाधिकारी पवार यांच्या बाजूने मैदानात उतरले. त्यांनी रंगरेज यांच्यावर आरोप केले. राहुल पवार यांनी शहरात ३५० हून अधिक बुथची बांधणी केली. पक्षवाढीसाठी ते अहोरात्र काम करीत आहेत. उलट रंगरेज हेच प्रभागात लक्ष देत नसल्याने समस्या घेऊन नागरिक पवार यांच्याकडे जातात. त्यामुळे रंगरेज यांनी प्रभागातील पात्रता ओळखावी असा हल्ला केला. शहर राष्ट्रवादीमध्ये वाद उफाळून आल्याने आता जयंत पाटील काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.