श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा

By Admin | Updated: May 20, 2015 00:08 IST2015-05-20T00:06:30+5:302015-05-20T00:08:42+5:30

खरसुंडीतील ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचीही मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Dismiss Srinath Devasthan Trust | श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा

श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा

खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टच्या अनागोंदी कारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करून ट्रस्ट बरखास्त करावा, हे देवस्थान शासनाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थ, व्यापारी आणि भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनादारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाचे हेमाडपंथी मंदिर असून, लाखो, करोडो लोकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिराची देखभाल श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट करीत आहे. मात्र देवस्थान कित्येक वर्षे विकासापासून वंचित राहिले. यासाठी ट्रस्टच्यावतीने कोणतेही विशेष प्रयत्न केले जात नाहीत. याचा नाहक त्रास भाविक-भक्तगणांना होत आहे. मंदिर परिसरात पुरेसे स्वच्छ पाणी, स्वच्छता, सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनेचा अभाव दिसून येत आहे.
आजपर्यंत देवस्थान ट्रस्टचे संचालक मंडळाचे सगेसोयरेच ग्रा. पं. सरपंच, उपसरपंच सदस्य असल्याने ग्रा. पं.वर ट्रस्टचा ताबा राहिला असून, ग्रा. पं. प्रशासनाने कधीही देवस्थान विकासासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. यामुळे हे प्रसिद्ध देवस्थान ‘क’ वर्गातच राहिले आहे. आजही गावातील ग्रा. पं. व शासनाच्या जागा ट्रस्टच्या संचालकाच्या सग्यासोयऱ्यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीची मिळकत असलेली पोस्टाची इमारत, जि. प. मुलींची शाळेची इमारत, जि. प. मुलांची शाळेची इमारत या सर्व जुन्या इमारती व वेताळबा पटांगणातील जागा, ग्रा. पं. सत्तेचा गैरवापर, फसवणूक करून ताबा मिळवला आहे. काही वर्षांपासून ग्रा. पं.तील काही सदस्यांनी ग्रा. पं.तीची ही मिळकत मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. यामुळे खरसुंडीसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुठेही महिलांसाठी सुलभ शौचालय, अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध होत नाही. अनेक लोकहिताच्या इमारती बनवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. याला जबाबदार देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत आहे. कारण आजी, माजी आमदारांनी गावाचा व मंदिराचा कायापालट करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला, परंतु तो कागदावरच राहिला आहे.
ग्रा. पं. आणि ट्रस्ट प्रशासन यांचे जागेविषयी एकमत न करता हा विकास आराखडा प्रलंबित ठेवला आहे. यामुळे नागरिक, भाविक यांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. वर्षातून दोन मोठ्या यात्रा, चैत्री आणि पौषी, बारा पौर्णिमा, श्री नाथाचे विविध उत्सव यानिमित्ताने गावामध्ये दहा ते बारा लाख भाविक येतात. रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिने नाथचरणी अर्पण करीत असतात. या देणगीचा सदुपयोग होतो की नाही, याच्या चौकशीसाठी ग्रामस्थ, भाविक आक्रमक बनले आहेत.
ट्रस्टच्यावतीने मंदिर परिसरात होत असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत आहे. या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. ट्रस्ट बरखास्त करून प्रशासक नेमून देवस्थानचा विकास साधावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, भाविकांतून होत आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर निवास वाडेकर, मल्लिकार्जुन बिराजदार, नंदकुमार पवार, सायबू शिंदे, बजरंग वाडेकर, सुलोचना वाडेकर, छाया साळुंखे, शीला भोसले, मंगल बर्गे, सोमनाथ पुजारी, साधना वाडेकर यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)

चांदीच्या रथातही गैरव्यवहार
देवस्थानच्या मिळकतीतून गावात लक्षणीय विकासकामे किंवा कल्याणकारी योजना राबवल्या जात नाहीत. दुष्काळामध्येही या ट्रस्टच्या माध्यमातून एखादी चारा छावणी अथवा पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविली गेली नाही.
देवस्थान ट्रस्ट कारभाराकडे धर्मादाय आयुक्तांचे पूर्णपणे दुर्लक्ष असून, येथे होत असलेल्या गैरकारभारावर पांघरूण घालण्याचे काम केले आहे.
भाविक, मानकरी आणि गलाई बांधव यांच्याकडून चांदी गोळा करून श्रीनाथाचा चांदीचा रथ बनविला असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Dismiss Srinath Devasthan Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.