कुरळप : वशी (ता. वाळवा) येथील अवैध मुरुम उपशाविरोधात संबंधितांवर फौजदारी व्हावी म्हणून उपोषणास बसलेल्यांपैकी स्वप्निल पाटील यांची प्रकृती खालावल्याने सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सुनील पाटील हे वशीच्या हनुमान मंदिरात उपोषणास बसले आहेत.वशी ग्रामतलावातील अवैध मुरुम उपशाविरोधात ग्रामस्थांनी तस्करांना रंगेहात पकडून दिले होते. यानंतर तहसीलदार यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने सुनील व स्वप्निल पाटील यांनी उपोषणास दि. २५ पासून सुरुवात केली आहे.आज उपोषणाचा सातवा दिवस असून, सकाळी स्वप्निल पाटील यांची प्रकृती खालावली. त्यामुळे प्रशासनाने त्यांना इस्लामपूर व तेथून सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवले आहे. या उपोषणाकडे प्रशासनाने कानाडोळा करून उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असून, सर्व पुरावे तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे असूनही कारवाई का होत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडल्याने ग्रामस्थांनी इस्लामपूर तहसील येथे धडक मोर्चा काढला. परंतु ४०० ते ५०० ग्रामस्थांच्या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासही कोणी उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.आज गावांमध्ये कँडल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, महिला, पुरुष यांचा पाठिंबा मिळत असून, हे आंदोलन जिवात जीव असेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)आंदोलन बेकायदेशीर कसे?वशी येथील मुरुम चोरीप्रकरणी आम्ही दि. २५ जानेवारीपासून उपोषणाला बसलो आहे. त्या दिवसापासून आमच्यावर देखरेख व प्रकृतीची तपासणी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत. मग तहसीलदारांना पाच दिवसानंतर आमचे सनदशीर मार्गाने सुरू असणारे उपोषण बेकायदेशीर असल्याचा कसा साक्षात्कार झाला, याचे उत्तर त्यांनी द्यावे असे उपोषणकर्ते सुनील पाटील यांनी आवाहन केले आहे. सर्व पुरावे तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे असूनही कारवाई का होत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By admin | Updated: February 2, 2015 00:14 IST