दुष्काळी भागातील दुधाचे ‘चीज’ झाले!
By Admin | Updated: July 1, 2014 00:39 IST2014-07-01T00:38:14+5:302014-07-01T00:39:36+5:30
मिरज तालुक्यातील चित्र

दुष्काळी भागातील दुधाचे ‘चीज’ झाले!
प्रवीण जगताप ल्ल लिंगनूर
मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, संतोषवाडी, सलगरे, जानराववाडी व बेळंकी परिसरातील दुधाला दूध संघांची अधिक पसंती मिळू लागली आहे. पूर्व भागाच्या टोकाला असणाऱ्या या गावांतून संकलित होणारे दूध तालुक्यातील अन्य दुधाच्या तुलनेत दर्जेदार असल्याचे सिद्ध होत आहे. या दुधापासून सर्वाधिक दर्जेदार चीज बनत आहे.
लिंगनूर सहकारी दूध सोसायटीचे सचिव मल्लय्या स्वामी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, लिंगनूर व परिसरात दूध संकलन वाढत चालले आहे. या दुधाचा दर्जा समान फॅट असणाऱ्या अन्य दुधापेक्षा जास्त आहे. दूध संघांकडून दुग्धजन्य उपपदार्थांची निर्मिती करीत असताना याची प्रचिती आली आहे. विशेषकरून या भागातील दुधापासून बनविलेले चीज अधिक दर्जेदार बनते. पनीरसारख्या अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतही या गावांतील दूध सरस ठरले आहे.
या भागातील दूध उत्पादकांच्या सोयीसाठी दूध संघ महत्त्वाची पावले उचलत आहेत. याचाच भाग म्हणून कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडून सुमारे सहा लाख रुपयांची तरतूद करून लिंगनूर येथील दूध सोसायटीच्या जागेत चिलिंग प्लॅँट उभारला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्लॅँटचे बांधकाम दूध सोसायटी करीत असून, त्या खोल्यांच्या भाड्याद्वारे सोसायटीला उत्पन्न मिळणार आहे.
या तीन-चार गावांतील खासगी दूध केंद्रांतही गोकुळचे दूध संकलन होत असल्याने ते सर्व दूध लिंगनूरच्या नूतन प्लॅँटमधूनच भविष्यात संकलित होणार आहे. या प्लॅँटच्या देखभालीचा खर्च संघ पाहणार असून, दूध भरण्याचा मोबदलाही संस्थेस मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील दूध उत्पादकांना आता सोन्याचे दिवस येणार आहेत, तर पशुपालनाचा व्यवसाय तेजीत चालणार आहे.