इस्लामपुरात चर्चा फसलेल्या उपोषणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:19+5:302021-02-07T04:24:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : एकीकडे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यावरील निष्ठा, तर दुसरीकडे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा भावी ...

The discussion in Islampur failed | इस्लामपुरात चर्चा फसलेल्या उपोषणाची

इस्लामपुरात चर्चा फसलेल्या उपोषणाची

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : एकीकडे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यावरील निष्ठा, तर दुसरीकडे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख आणि आता नानासाहेब महाडिक यांचे नाव व्यापारी संकुलाला देण्याची केलेली मागणी, या परस्परविरोधी भूमिकांमुळे येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या फसलेल्या उपोषणाची शहरात चर्चा आहे.

लोकराज्य विद्या फाउंडेशनच्या माध्यमातून तांदळे सामाजिक उपक्रम राबवितात. स्मशानभूमी स्वच्छ करून तेथे विविध उपक्रम राबविण्यावर समाजातून चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यांना प्रसिद्धीही मिळाली, परंतु कोरोनाच्या काळात तांदळे कोठे दिसले नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्यावरील प्रेम त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर प्रकट केले आहे. दुसरीकडे मात्र मागील पालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीतून निवडणूक लढवली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून करत तांदळे सोशल मीडियावर प्रचार करत होते.

अण्णासाहेब डांगे यांची प्रतिमा नगरपालिकेत लावावी आणि पालिकेच्या व्यापारी संकुलाला नानासाहेब महाडिक यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी तांदळे यांनी नुकतेच उपोषण केले. मात्र डांगे यांच्याबद्दल तांदळे यांची आत्मीयता भाजपमधील नेत्यांना रुचली नाही. त्यामुळे विकास आघाडीतील काही नेत्यांनी तांदळे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला नाही. भाजपचा महाडिक गट आणि विकास आघाडीतील नेते उपोषणस्थळी असतील, असे वाटल्याने राष्ट्रवादीच्या डांगे गटानेही तांदळे यांचे उपोषण दुर्लक्षित केले. यामुळे गटबाजीचे राजकारण चांगलेच रंगले. तांदळे नेमके कोणाचे, याबाबत सर्वपक्षीय नेत्यांत संभ्रम आहे.

फोटो-०६चंद्रशेखर तांदळे

Web Title: The discussion in Islampur failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.