जयंत पाटील-शिकलगार यांच्यात बंद खोलीत चर्चा

By Admin | Updated: January 16, 2016 00:21 IST2016-01-16T00:05:20+5:302016-01-16T00:21:01+5:30

महापौर-उपमहापौर निवड : इतर इच्छुकांनी साधले संधान

Discussed in closed room between Jayant Patil-Shiklagar | जयंत पाटील-शिकलगार यांच्यात बंद खोलीत चर्चा

जयंत पाटील-शिकलगार यांच्यात बंद खोलीत चर्चा

सांगली : महापालिकेच्या महापौर पदाचे प्रमुख दावेदार काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हारूण शिकलगार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांची सांगलीत भेट घेतली. शासकीय विश्रामगृहातील बंद खोलीत जयंतराव व शिकलगार यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर शिकलगार यांनी थेट विजय बंगला गाठत जयश्रीताई मदन पाटील यांचीही भेट घेतली. आणखी एक इच्छुक राजेश नाईक यांनीही विजय बंगल्यावर हजेरी लावली होती. महापौरपदासाठी इतर इच्छुकांनीही जयंतरावांशी सांगलीबाहेर भेट घेऊन संधान झाले आहे.
विद्यमान महापौर विवेक कांबळे यांची ८ फेब्रुवारी रोजी मुदत संपत आहे. महापालिका प्रशासनाने ६ फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. येत्या चार दिवसात निवडीचा कार्यक्रम व निवडणूक अधिकाऱ्याची घोषणा होणार आहे. प्रशासनाने महापौर निवडीची प्रक्रिया सुरू केल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील हे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सांगलीत आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात काँग्रेसचे नगरसेवक हारूण शिकलगार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते. तब्बल तासभर बंद खोलीत त्यांची चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. सूर्यवंशी यांनी, शिकलगार भेटून गेले असले तरी, जयंतरावांशी त्यांचे काय बोलणे झाले, हे माहीत नसल्याचे सांगितले. काँग्रेसच्या इतर इच्छुकांनीही जयंतरावांशी भेट घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. काहीजणांनी पुणे, मुंबईत भेट घेतल्याचे समजते.
महापौर निवडीत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यास राष्ट्रवादीच्या साथीने महापौर-उपमहापौर पदावर वर्चस्व राखता येणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच शिकलगार यांनी शुक्रवारी जयंतरावांची भेट घेऊन पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी विजय बंगल्यावर जाऊन जयश्रीतार्इंची भेट घेतली. सध्या मदनभाऊंचा विजय बंगला या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीची गरज : जुळलेले सूर कायम राहणार
दरम्यान, जयंतराव व शिकलगार यांच्या महापौर निवडीवर चर्चा झाल्याचे समजते. सध्या काँग्रेसमधील मदन पाटील गटाला राष्ट्रवादीच्या साथीची गरज आहे. गेल्या वर्षभरात जयंत पाटील व मदन पाटील यांनी एकत्रित निवडणुका लढविल्या आहेत. त्यांचे जुळलेले सूर मदनभाऊंच्या पश्चातही कायम राहतील, असा या गटाला विश्वास आहे.

Web Title: Discussed in closed room between Jayant Patil-Shiklagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.