साहित्य शिक्षणातही भेदभाव
By Admin | Updated: February 2, 2015 00:13 IST2015-02-01T23:41:47+5:302015-02-02T00:13:56+5:30
राजन खान : विट्यात ३३ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन

साहित्य शिक्षणातही भेदभाव
विटा : लेखकांनी निर्मळ व तटस्थ माणूस म्हणून लिहिलं पाहिजे. सध्या विद्यापीठातून वेगवेगळे साहित्य शिकवले जाते. त्यात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, मुस्लिम साहित्य असे भेद करून ठेवले आहेत. परंतु, याकडे एकदा लेखक व साहित्य म्हणून पाहणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. विटा येथे साहित्य सेवा मंडळ, मुक्तांगण वाचनालय व भारतमाता ज्ञानपीठाच्यावतीने आयोजित ३३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान खान यांनी भूषविले. यावेळी माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, स्वागताध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील, कवी दयासागर बन्ने, बाळासाहेब पवार, प्रमोद पुजारी, रघुराज मेटकरी, अॅड. अपर्णा केसकर, प्रा. विश्वनाथ गायकवाड, ऋषिकेश मेटकरी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात खान म्हणाले, लेखकांची मंदिरे बांधणारे महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. वारकरी संप्रदायाची स्थापना जातीभेद, कर्मकांड संपविण्यासाठी झाली. परंतु, आज जातीभेद संपला का? लेखकांनीही आज जाती-पातीचं लिहिणं थांबविलं पाहिजे. निर्मळ व तटस्थ माणूस म्हणून लिहिता आले पाहिजे. जागतिक कीर्तीचे लेखक व्हायचे असेल, तर एकांगी लिहिणे टाळले पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि राज्यकर्त्यांचे सिंचनातील घोटाळे हे आता साहित्यात आले पाहिजे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील म्हणाले, विट्यात गेल्या ३३ वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे विट्याच्या इतिहासात याची नोंद घ्यावी लागेल. ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातून साहित्य चळवळ निर्माण व्हावी.स्वागत व प्रास्ताविक रघुराज मेटकरी यांनी केले. यावेळी वैशाली कोळेकर, संमेलनास पृथ्वीराज पाटील, तेजस्विनी खान, ‘मुक्तांगण’चे अध्यक्ष विष्णुपंत मंडले, योगेश मेटकरी, स्वाती शिंदे-पवार, शिवराम पाटील, दीपाली गुजले, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, अरूण लंगोटे, गंगाधर लकडे, प्रदीप पाटील, श्रीकांत माने, दयानंद बनसोडे, वसंत पाटील, बाळकृष्ण चव्हाण, नवोदित लेखक, कवी उपस्थित होते. आभार अभिजित निरगुडे यांनी मानले. (वार्ताहर)
टीव्हीचे अतिक्रमण
पतंगराव कदम म्हणाले, साहित्यात मोठी ताकद आहे. नवोदित लेखकांनी व तरूणांनी लोकांना अभिप्रेत साहित्याची निर्मिती केली पाहिजे. सध्या टीव्ही माध्यमाचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तरूण मुले सुसंस्कृत होण्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांची गरज आहे.