विनायक पाटील यांच्या खेळीकडे संचालकांच्या नजरा
By Admin | Updated: March 1, 2015 23:17 IST2015-03-01T22:56:38+5:302015-03-01T23:17:14+5:30
राजारामबापू दूध संघ निवडणूक : मोर्चेबांधणीस वेग; अध्यक्ष पदासाठी संग्राम फडतरेंच्या नावाची चर्चा

विनायक पाटील यांच्या खेळीकडे संचालकांच्या नजरा
अशोक पाटील - इस्लामपूर --प्रतिदिनी २ लाखाहून अधिक लिटर दुधाचे संकलन करणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. परंतु आगामी पाच वर्षांसाठी ‘महानंद’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. या हालचालींवर वाळवा तालुक्यातील आजी—माजी संचालकांचे लक्ष आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या सक्षम व नावाजलेल्या राजारामबापू दूध संघावर संचालक म्हणून जाण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठी स्पर्धा असते. तालुक्यातील अति महत्त्वाच्या गावांना संधी देण्याच्या हेतूने ही निवडणूक शक्यतो बिनविरोधच केली जाते.
संचालक निवडीचा अंतिम निर्णय जयंत पाटील यांचा असला तरी, संघ आपल्या ताब्यात येण्यासाठी ताकारीचे नेते व ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. याला काही संचालकांचा अंतर्गत विरोध असल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे. तसेच विद्यमान अध्यक्ष नेताजी पाटील हे, निवडणुकीत आपणास काहीही रस नाही, अध्यक्षपदाचा मोह नाही, असे भासवत आहेत. परंतु तेही विनायकराव पाटील यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आपला गट सक्षम करण्याच्या तयारीत आहेत.
उपाध्यक्ष संग्राम फडतरे (आष्टा) हे अध्यक्षपदाचे दावेदार असल्याची चर्चा आहे. आष्टा हे मतदारसंघातील मोठे गाव आहे. विधानसभा निवडणुकीत ३ हजार मतांची आघाडी आष्टा गावाने दिली आहे. त्यामुळे जयंत पाटील हे संग्राम पाटील यांचाही विचार करु शकतील, अशी चर्चा फडतरे यांच्या कार्यकर्त्यांतून होत आहे.
१७ ते १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये दोन महिलांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. दूध व्यवसाय हा महिलांच्या हाती असतो. त्यामुळे अध्यक्षपदाची संधी महिलांनाच द्यावी, अशीही मागणी पुढे येऊ शकते.
दूध संघाचा कारभार स्वच्छ आहे. विद्यमान अध्यक्ष नेताजी पाटील आणि मी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. संघाच्या निवडणुकीत कोणतीही स्पर्धा नाही. नेताजी पाटील हे आमचे स्रेहीच आहेत. ते पुन्हा एकदा अध्यक्ष झाले तरी आम्हाला आनंदच होईल.
- विनायकराव पाटील,
माजी अध्यक्ष, महानंद.
जयंत पाटील यांनी दूध संघावर मला दीर्घकाळ काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करुन दाखवले आहे. संघाचा चौफेर विकास करुन दूध संकलन २ लाखावर नेले. आता नवीन चेहऱ्याला संधी दिली तरी हरकत नाही. जयंत पाटील घेतील तो निर्णय मान्य करुन, येथून पुढे आपण राजकारणात सक्रिय राहू.
- नेताजीराव पाटील,
अध्यक्ष, राजारामबापू दूध संघ.
संघाच्या उपाध्यक्ष पदाचा अनुभव, आष्टा शहराने राष्ट्रवादीला दिलेली ताकद, युवकांना संधी देण्याचा जयंत पाटील यांचा विचार पाहता, आपणालाही अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. भविष्यात आपणास संधी दिली, तर दूध संघाचा कारभार आधुनिक पध्दतीने करुन संघ प्रगतीपथावर नेऊ.
- संग्राम फडतरे,
उपाध्यक्ष, राजारामबापू दूध संघ.