सभापती बनणार बाजार समितीवर संचालक
By Admin | Updated: October 24, 2015 00:21 IST2015-10-24T00:09:04+5:302015-10-24T00:21:31+5:30
स्वीकृतपदी संधी : पंचायत समित्यांचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द

सभापती बनणार बाजार समितीवर संचालक
मिरज : सांगली बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदासाठी मिरज, कवठेमहांकाळ व जत पंचायत समित्यांनी केलेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. स्वीकृत संचालक पदासाठी सभापतींच्या नावांच्या शिफारशीचे ठराव पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मिरजेतून दिलीप बुरसे, कवठेमहांकाळमधून वैशाली पाटील व लक्ष्मी मासाळ या तीन सभापतींच्या नावांच्या शिफारशीचे ठराव पाठविण्यात येणार आहेत.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या मिरज, कवठेमहांकाळ व जत या तीन पंचायत समित्यांपैकी एका सभापतीची बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात येते. या पदासाठी पंचायत समितीच्या सभापतींच्या नावाची शिफारस करण्याचा नियम आहे. सभापती गैरहजर असल्यास अथवा पद रिक्त असेल, तरच पंचायत समितीच्या प्रतिनिधीच्या नावाची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करण्याची कृषी उत्पन्न बाजार समिती नियमान्वये तरतूद आहे. मात्र तीनही पंचायत समित्यांमध्ये हा नियम डावलून स्वीकृत संचालक पदांसाठी सभापतींऐवजी सदस्यांच्या नावांचे ठराव करण्यात आले होते. मिरज, कवठेमहांकाळ व जत पंचायत समितीत ठराव झालेल्यांनी, स्वीकृत संचालक पदासाठी आपलीच वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरु केले असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वी केलेले ठराव रद्द करुन स्वीकृत संचालक पदासाठी पंचायत समितीच्या सभापतींच्या नावे ठराव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे मिरजेतून दिलीप बुरसे, कवठेमहांकाळमधून वैशाली पाटील व जतमधून लक्ष्मी मासाळ यांची नावे पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तीन पंचायत समित्यांपैकी एका सभापतीची निवड होणार असल्याने, तीनही सभापतींनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)
जत तालुक्यातून सभापती लक्ष्मी मासाळ यांना संधी
जत : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून पंचायत समिती सभापती लक्ष्मी मासाळ यांच्या नावाची शिफारस असणारा ठराव पाठविण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी जत पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना पाठविला आहे. त्यामुळे सुनील पवार यांना चपराक बसली आहे. जत पंचायत समिती मासिक बैठकीत स्वीकृत सदस्याचे नाव पाठविण्यासंदर्भात एक महिन्यापूर्वी चर्चा झाली. यावेळी सभापती लक्ष्मी मासाळ, आमदार विलासराव जगताप समर्थक सदस्य सुनील पवार हे दोघेजण इच्छुक होते. त्यामुळे सभागृहात मतदान घेण्यात आले. पवार यांना दहा, तर मासाळ यांना आठ मते मिळाली. त्यामुळे पवार यांच्या नावाचा ठराव संमत करून जिल्हाधिकारी कार्यालास पाठविण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी-विक्री (विकास व विनिमय) नियम १९६७ मधील नियम - ४० अ अन्वये पंचायत समिती सभापती यांच्या नावे ठराव करून पाठविण्याचा आहे. याची अंमलबजावणी आपण केली नाही, असे ताशेरे जिल्हाधिकारी यांनी जत पं. स. गट विकास अधिकारी यांच्यावर या आदेशात ओढले आहेत.