तासगावला सभापती निवडीत राष्ट्रवादीमध्ये थेट बंडखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:49+5:302021-09-02T04:57:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे संभाजी पाटील यांची निवड झाली आहे. बुधवारी झालेल्या निवडीवेळी ...

Direct rebellion within the NCP in electing Tasgaon as Speaker | तासगावला सभापती निवडीत राष्ट्रवादीमध्ये थेट बंडखोरी

तासगावला सभापती निवडीत राष्ट्रवादीमध्ये थेट बंडखोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे संभाजी पाटील यांची निवड झाली आहे. बुधवारी झालेल्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या सदस्याला भाजपने फूस लावून बंडखोरी करायला लावली. यावेळी समान मते पडताच अध्यासी अधिकारी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी चिठ्ठी उचलून निवड केली असता सभापतीपदाची माळ पाटील यांच्या गळ्यात पडली. यामुळे पंचायत समितीमधील राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली आहे, मात्र बंडखोरी चव्हाट्यावर आली.

कमल पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती निवडीसाठी बुधवारी पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता तहसीलदार ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. संभाजी पाटील आणि संजय जमदाडे यांच्यात जोरदार चुरस होती. आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील व युवा नेते रोहित पाटील यांनी पाटील यांचे नाव निश्चित केल्याचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले. त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. जमदाडे नाराज होऊन निघून गेले. या नाराजीचा फायदा उठवत भाजपने फूस लावून अर्ज दाखल करायला लावला. त्यांच्या अर्जावर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थक वर्षा फडतरे यांनी सूचक म्हणून सही केली.

अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमदाडे यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. मतदानावेळी राष्ट्रवादीच्या संभाजी पाटील यांना सहा मते पडली. खासदार समर्थकांच्या पाच मतांच्या जोरावर बंडखोरी केलेल्या संजय जमदाडे यांनाही सहा मते पडली.

सभापती पदासाठी समान मते पडल्याने तहसीलदार ढवळे यांनी चिठ्ठीद्वारे निवडीचा निर्णय घेतला. यावेळी उचललेली चिठ्ठी संभाजी पाटील यांच्या नावाची आली. यानंतर त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

चौकट

पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

या निवडीनंतर राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य रवींद्र पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती कमल पाटील, कवठेमहांकाळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष महेश पवार, बाजार समितीचे सभापती नवनाथ मस्के यांनी सभापती संभाजी पाटील यांचा सत्कार केला.

Web Title: Direct rebellion within the NCP in electing Tasgaon as Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.