दिलखुलास, बेधडक धनराज पिल्ले
By Admin | Updated: July 1, 2014 00:39 IST2014-07-01T00:39:03+5:302014-07-01T00:39:27+5:30
नम्रतेचा मानदंड : देशातील हॉकीच्या वैभवासाठी तळमळ

दिलखुलास, बेधडक धनराज पिल्ले
युनूस शेख ल्ल इस्लामपूर
हॉकीच्या मैदानावर चित्त्याच्या चपळाईने आणि विद्युल्लतेच्या वेगाने खेळताना जवळपास १६-१७ वर्षे आपले अधिराज्य गाजवणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकीपटू व भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या दिलखुलास आणि बेधडक स्वभावातील नम्रतेला इस्लामपूरकरांनी सलाम केला. प्रत्येकी चारवेळा आॅलिम्पिक, आशियाई, विश्वचषक यासह इतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या या राकट खेळाडूने क्रीडा रसिकांवर आपली छाप सोडली.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील क्रीडा प्रशिक्षक प्रा. चंद्रकांत कळसकर यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त धनराज पिल्ले आले होते. अत्यंत भावस्पर्शी वातावरणात झालेल्या या सोहळ्यात धनराज अण्णाच्या उपस्थितीचे मोठे कुतूहल होते. कार्यक्रमातील मनोगतांमधून प्रा. कळसकर व पिल्ले अशा दोघांनाही सार्वजनिक जीवनात अण्णा या टोपण नावाने ओळखले जाते, ही बाब स्पष्ट झाली आणि या दोन अण्णांचा वार्तालाप मनसोक्तपणे सुरू झाला.
कवी प्रा. एकनाथ पाटील यांनी आपल्या भारदस्त आवाजात धनराज पिल्ले यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी दाद दिल्यावर तेवढ्याच विनम्रपणे पिल्ले अण्णांनी त्यांना हात जोडून अभिवादन केले. परिचय संपल्यावर पुन्हा खुर्चीतून उठून जात ‘सॅल्यूट’ ठोकत पिल्ले यांनी आतापर्यंत माझा असा परिचय कुणी करून दिला नव्हता, अशी भावना व्यक्त करत प्रा. एकनाथ पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सत्कारावेळी त्यांना राम गुरव या तुतारी फुंकणाऱ्या मावळ्याने कोल्हापुरी फेटा बांधल्यावर पिल्लेंनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. त्यांच्या या विनम्रतेने अवघे सभागृह थक्क झाले होते. एवढा मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू, मात्र कुठेही गर्वाचा अहंकार न बाळगणारा धनराज अण्णा उपस्थितांच्या मनात ठासून बिंबला.
भाषणासाठी उभे राहिल्यावर प्रा. कळसकरांना गौरव करताना ‘मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन इन इस्लामपूर’ असे इंग्रजी वाक्य उच्चारत हिंदी भाषेतून मुझे समझ मे नही आ रहा है, की मै आपको कैसे प्रणाम करू! असे म्हणत तेथूनच दोन्ही हात जोडले. पुढे मराठीत बोलताना अण्णांच्या शेजारी बसून हा अण्णा बरेच शिकला. मी थोडासा तापट आणि आक्रमक स्वभावाचा आहे, मात्र इथून पुढे मी तुमच्यासारखाच हसतमुख राहणार. माझ्या अॅकॅडमीतील खेळाडूंसाठी तुमच्याप्रमाणेच मित्र, मार्गदर्शक आणि पालकाची भूमिका निभावणार, असे स्पष्ट करून मला इस्लामपूरला यायला मिळाले, हे माझे भाग्य आहे, अशी कृतज्ञ भावना व्यक्त करून त्यांच्या पाठीमागेच बसलेल्या श्रीमती प्रमिला कळसकर यांच्या पाया पडून पिल्ले यांनी आशीर्वाद घेतला. या प्रसंगाने तर व्यासपीठासह संपूर्ण सभागृहही नतमस्तक झाले. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले होते. तेथे सत्कारासाठीही धनराज यांनी त्यांना मान दिला.
हॉकीचे गतवैभव परत मिळायला हवे, ही तळमळ त्यांच्या शब्दा-शब्दामधून व्यक्त होत होती. खेळाडूंनी आत्मकेंद्री न होता देशासाठी खेळायला हवे. प्रसिध्दीसाठी न खेळता क्षमतेनुसार खेळून सहकारी खेळाडूला संधी द्यावी, अशा भावनेतून धनराज पिल्ले यांच्यामध्ये ठासून भरलेल्या राष्ट्रीयत्वाची जाणीव होते. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभलेल्या जगन्मान्य खेळाडूने इस्लामपूरकरांनाही जिंकले.