दिलीपतात्यांकडून आश्वासनांचा पाऊस!
By Admin | Updated: September 24, 2015 00:23 IST2015-09-24T00:22:30+5:302015-09-24T00:23:56+5:30
जिल्हा बँक सर्वसाधारण सभा : ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रयत्न

दिलीपतात्यांकडून आश्वासनांचा पाऊस!
सांगली : पाच वर्षांत जिल्हा बँकेला राज्यात एक नंबरी बनवू, यासह २६ गावांत विस्तारित कक्ष, मागणीनुसार एटीएम सुविधा, सोसायटीचे सक्षमीकरण, विकास निधीला नफ्यातील दहा टक्के रक्कम देणार, अशा विविध घोषणांचा पाऊस बुधवारी जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत पडला. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी या सभेत आश्वासनांवर आश्वासने दिली.
जिल्हा बँकेची ८८ वी वार्षिक सभा बुधवारी वसंतदादा पाटील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीपतात्या पाटील होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, मोहनराव कदम, विलासराव शिंदे, बी. के. पाटील, विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, सभासदांनी विश्वस्त म्हणून आम्हाला बँकेत निवडून दिले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या पाच वर्षांत राज्यातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य व नंबर एकची बँक म्हणून आपल्या बँकेचा नावलौकिक होईल. यंदा बँकेला १९ कोटी १८ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. या नफ्यातील दहा टक्के रक्कम सोसायट्यांना विकास निधी म्हणून देणार आहोत. जिल्ह्यात ग्राहकांच्या मागणीनुसार एटीएम सुविधा देऊ. बँक शाखा नसलेल्या २६ गावांत विस्तारित कक्ष सुरू केले जाणार आहेत. बँकेला आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न केले जातील. सोसायट्यांना अनिष्ट तफावतीतून बाहेर काढून त्या सक्षम करण्यासाठी बँकेकडून सर्वतोपरी सहकार्य राहील. सोसायट्यांना नवीन इमारत बांधकामासाठी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. विकास सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांना प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज, कर्जवाटप मर्यादेत वाढ, सोसायट्यांना संगणकांची सुविधा देऊन त्या थेट बँकेशी जोडण्याची योजना राबवणार आहोत.
बँकेचे कार्यकारी संचालक शीतल चोथे यांनी नोटिशीचे वाचन केले. व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी आभार मानले. सभेला संचालक महेंद्र लाड, डॉ. सिकंदर जमादार, सुरेश पाटील, श्रद्धा चरापले, कमल पाटील, माजी अध्यक्ष शंकरराव पाटील, डी. के. पाटील, दिलीप वग्याणी यांच्यासह सभासद उपस्थित होते.
बँकेत गैरव्यवहार नाही : पाटील
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या पंधरा वर्षांत दीड कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे, या मुद्द्यावर अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बँकेत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्ट केले. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. काहीजण बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही काय महापालिका व जिल्हा परिषद नव्हे, तिथे काही घडले तर फरक पडत नाही. आमच्या हातात बँक सुरक्षित आहे. २००१ पासून बँकेत काही छोट्या गोष्टी घडल्या असतील, पण त्याची वसुलीही झाली आहे, असा खुलासा त्यांनी केला.