दिलीप कुमार यांचा सांगली, मिरजेविषयी होता जिव्हाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:57+5:302021-07-08T04:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार हे हाफीज धत्तुरेंसाठी मात्र किंगमेकर ठरले होते. मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या निमित्ताने ...

दिलीप कुमार यांचा सांगली, मिरजेविषयी होता जिव्हाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार हे हाफीज धत्तुरेंसाठी मात्र किंगमेकर ठरले होते. मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या निमित्ताने दिलीपकुमार यांना सांगली, मिरजेविषयी जिव्हाळा होता. त्यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली.
अभिनेता म्हणून असलेल्या ग्लॅमरचा फायदा दिलीपकुमार यांनी मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला करुन दिला. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत संघटनेने कॉंग्रेससोबत हातमिळवणी केली, त्याच्या बदल्यात संघटनेला राज्यात सहा मतदारसंघ मिळाले. त्यामध्ये मिरज मतदार संघाचाही समावेश होता. त्यावेळी संघटनेला पुरेसा चेहरा नसल्याने तिकिटासाठी पुढे यायला कोणी तयार नव्हते. तीन-चार मुस्लिम नेत्यांनी, नगरसेवकांनी नकार दिला. त्यामुळे हाफीज धत्तुरेंचे नाव अकल्पितपणे पुढे आले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा व सायकलवरुन पाव विकणारा माणूस थेट आमदारकीला उभा राहिला.
मुस्लिम ऑर्गनायझेशनने दिलीपकुमार यांना प्रचारासाठी आणले. किसान चौकात प्रकाशबापू पाटील आणि डॉ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत दिलीपकुमार यांची सभा झाली. त्यांची छबी पाहण्यासाठी अवघी सांगली, मिरज शहरे लोटली होती. किसान चौक व लक्ष्मी मार्केट परिसरात पाय ठेवायला जागा नव्हती. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या दिलीपकुमार यांची मतदारांवर छाप पडली. ‘आपल्या माणसा’ला विधानसभेत पाठविण्याचे त्यांचे आवाहन निवडणुकीचा नूरच पालटून टाकणारे ठरले. मिरज मतदारसंघात ‘क्रांती’ घडली. हाफीजभाई एकदा नव्हे, तर सलग दोनवेळा आमदार झाले. हा आम आदमी निवडणुकीनंतरही दिलीपकुमार यांच्या संपर्कात राहिला होता.
सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा भव्य मेळावा झाला, त्यावेळीही दिलीपकुमार प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने जिल्ह्यात चांगलाच जोम धरला. त्यांच्या हस्ते सांगलीत मुस्लिम अर्बन बँकेचे उद्घाटनही झाले होते. संघटनात्मक कामानिमित्ताने सांगली-मिरजेतील सलीम सौदागर, बादशाह पाथरवट, नासीर शरीकमसलत अशी बरीच मंडळी दिलीपकुमार यांच्या संपर्कात होती. दिलीपकुमार यांनी वेळोवेळी संघटनेसाठी पाठबळ दिले. मिरजेत माझ्या पूर्वजांनी फळे विकलीत, अशी आठवण ते सांगायचे.
सांगली-मिरजेशी त्यांचे ऋणानुबंध अनेक वर्षे राहिले. त्यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी आठवणींना उजाळा दिला.