दिलीपकुमार यांनी मिळवून दिली आबासाहेब शिंदे, हाफिज धत्तुरे यांना मिरजेत काँग्रेसची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:59+5:302021-07-08T04:17:59+5:30
मिरज : दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांनी मिरजेला अनेकदा भेट दिली होती. मिरज विधानसभेसाठी आबासाहेब शिंदे व हाफिज धत्तुरे ...

दिलीपकुमार यांनी मिळवून दिली आबासाहेब शिंदे, हाफिज धत्तुरे यांना मिरजेत काँग्रेसची उमेदवारी
मिरज : दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांनी मिरजेला अनेकदा भेट दिली होती. मिरज विधानसभेसाठी आबासाहेब शिंदे व हाफिज धत्तुरे यांना काँग्रेसची उमेदवारी दिलीपकुमार यांनी मिळवून दिली होती. धत्तुरे यांच्या प्रचारासाठी मिरजेतील किसान चाैकात झालेली दिलीपकुमार यांची प्रचारसभा आजही सर्वाच्या स्मरणात आहे.
दिलीपकुमार यांच्या बहुसंख्य चित्रपटांचे चित्रीकरण करणारे सिनेछायाचित्रकार व्ही. बाबासाहेब मिरजेचे होते. व्ही. बाबासाहेब यांच्यामुळे दिलीपकुमार यांची मिरजेतील तत्कालीन काँग्रेस नेते आबासाहेब शिंदे यांच्याशी मैत्री झाली. गंगाजमुना चित्रपटाच्या सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रमासाठी सांगलीत आलेले दिलीपकुमार त्यावेळी आबासाहेब शिंदे यांच्या गावी म्हैसाळ येथे त्यांच्या शेतातही गेले होते. १९७२ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे शिफारस करून दिलीपकुमार यांनी आबासाहेब शिंदे यांना मिरज विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र उमेदवारी मिळाल्यानंतर मुंबईतून परत येताना तुंगजवळ अपघातात आबासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वर्षभराने मिरजेत किसान चाैकात आबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी दिलीपकुमार आले होते. १९९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मुस्लिम ओबीसी संघटनेची काँग्रेससोबत युती घडवून आणण्यातही दिलीपकुमार यांची मोठी भूमिका होती.
मिरज, परभणी व भिवंडी या जागा मुस्लिम ओबीसी संघटनेला मिळवून देऊन दिलीपकुमार तिन्ही ठिकाणी प्रचारालाही गेले होते. अंबानी यांच्या खासगी विमानाने कोल्हापूरला व तेथून मोटारीने मिरजेला आलेल्या दिलीपकुमार यांनी मिरजेत किसान चाैकात हाफिज धत्तुरे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. या सभेतही त्यांनी आबासाहेब शिंदे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला. सत्तेचा खेळ थांबविण्यासाठी काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन करताना त्यांनी काँग्रेसच्या विरोधकांवर टीका केली होती. प्रचारसभेसाठी मिरजेत आल्यानंतरही दिलीपकुमार यांनी आबासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांची चाैकशी करून दीपक शिंदे, मनोज शिंदे यांची भेट घेतली होती. विधानसभेत हाफिज धत्तुरे निवडून आल्यानंतर त्यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी सांगलीत दिलीपकुमार आले होते. मागास मुस्लिम ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलीपकुमार यांची तळमळ होती. त्यासाठी मुस्लिम ओबीसी संघटनेला त्यांनी तनमनधनाने मदत केल्याचे संघटनेचे नासिर शरिकमसलत यांनी सांगितले.