कर्मनिष्ठ नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:05+5:302021-09-05T04:31:05+5:30

१९७४ मध्ये स्वर्गीय एम. डी. पवार यांच्या शहर सुधार समिती विरुद्ध नागरिक संघटना स्थापन करण्यात आली आणि तिथून खऱ्या ...

Diligent leadership | कर्मनिष्ठ नेतृत्व

कर्मनिष्ठ नेतृत्व

१९७४ मध्ये स्वर्गीय एम. डी. पवार यांच्या शहर सुधार समिती विरुद्ध नागरिक संघटना स्थापन करण्यात आली आणि तिथून खऱ्या अर्थाने पवार पार्टी विरुद्ध पाटील पार्टी उदयास आली. यामध्ये आदरणीय अण्णासाहेब डांगे, स्वर्गीय अशोक पाटील, स्वर्गीय कोरेआप्पा, बिजली मल्ल भगवान पाटील अशी मोट बांधण्यात आली. १९७४ च्या नगराध्यक्ष लढतीत विजयभाऊंचा पराभव झाला आणि अपयश ही यशाची पहिली पायरी मानून सुरू झाला धुरंधर विजयराव गणपतराव पाटील यांचा राजकीय प्रवास...!

१९८४ मध्ये लोकनेते आदरणीय राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधनानंतर जयंत पाटील यांच्या राजकीय एंट्रीने नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यावेळी ३१ वाॅर्डापैकी तब्बल २९ वॉर्डांत २९ उमेदवार निवडून आले आणि इस्लामपूर नगरपालिका नागरिक संघटनेच्या हाती आली आणि सुरू झाला साहेब, भाऊंचा राजकीय आणि घरगुती जिव्हाळा...!

या पाच वर्षांत उरूण इस्लामपूर शहराच्या, नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी तीन वर्षे कोरे आप्पा, एक वर्ष सांभारेआबा आणि एक वर्ष भाऊंचे, यानंतर पुढे पुढे भाऊंचे राजकीय वर्चस्व वाढत गेले. कालांतराने गटातील दिग्गज नेते निघून गेले; पण भाऊंची दमदार वाटचाल सुरू होती. त्याला साथ होती ती भगवान पाटील, अशोकराव उरूणकर, शंकर चव्हाण, सुभाष सूर्यवंशी, साहेबराव कोरे आणि अनिल पावणे या अत्यंत विश्वासू आणि खास मित्र परिवाराची आणि धुरंधर राजकारणी भाऊ यांची.

केंद्र आणि महाराष्ट्र, ज्येष्ठ व मातब्बर नेते शरद पवार आणि इस्लामपूरच्या स्थानिक राजकारणात विजयराव पाटील ओळखणे, त्यांना समजून घेणे, त्यांची चाल ओळखणे खूपच अवघड.

इस्लामपूर शहराच्या विकासकामांत भाऊ नेहमीच दक्ष असत, शासकीय इमारती, अद्ययावत नाट्यगृह, खुले नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा, उपजिल्हा रुग्णालयात, एखाद्या बागेला लाजवेल अशा स्मशानभूमी, यासोबत इस्लामपूर शहराला बिसलेरीसारखे पाणी देण्याची महत्त्वाकांक्षा, स्वच्छ पाणी योजना, स्वच्छ इस्लामपूर सुंदर इस्लामपूर, हरित शहर संदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी निधी मंजूर करून द्यायचा आणि भाऊंनी कामांना न्याय द्यायचा हे समीकरणच झाले होते.

सुभाष सूर्यवंशी किंवा शंकर चव्हाण यांच्यासोबत भाऊंची दुचाकीवरून नगरपालिकेत झालेली एंट्री लक्षवेधी असे. कडक इस्त्रीच्या विजार-शर्टमधील भाऊ पैलवान स्टाईलने पालिकेत प्रवेश करत. नगरपालिकेचा कारभार पाहताना भाऊ नेहमीच शिपायांच्या बाकड्यावर बसलेले दिसतील. शहरातील आलेले, व्यापाऱ्यांच्या गराड्यात असताना त्यांची समस्या काय ती समजली, पटली की कागदी घोड्यांना थारा नाही.

१९९८ मध्ये नागरिक संघटना म्हणजे भाऊ. त्यांच्या पार्टीचे १२, तर शहर सुधार समितीचे ११ उमेदवार असताना नगराध्यक्ष पदाच्या मतदानात एका मताने आनंदराव मलगुंडे दादा विजय झाले, त्या अनुषंगाने पत्रकारांनी याबाबत विचारले असता अत्यंत सहजतेने मिश्कीलपणे भाऊंनी सांगितले, माझा चष्मा काल घरात विसरला होता, त्यामुळे मीच चुकून विरोधी बाजूला मतदान केले.

चाणक्य नीतीचा कोळून केलेला अभ्यास वेळोवेळी शाश्वत होत होता. राजकारणाबरोबर सहकार चळवळ उभी करताना शहरातील नागरिकांना सहकार्य व्हावे या हेतूने अनेक संस्था उभ्या केल्या. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला उभारी देऊन नगरपालिकेसोबत आपल्या सहकारी संस्थांचे उच्च पद देऊन त्यांच्या निष्ठेला न्याय द्यावा तो भाऊंनीच.

राजकारणातील वैर त्यांनी खासगी आयुष्यात आणले नाही. १९१८ पासून राजकारणातील सत्ता सोबत असलेल्या वारकरी संप्रदायातील घरातील भाऊंचा जन्म. त्यामुळे पहिल्या आणि शेवटच्या पराजयाने विजय गणपतराव पाटील यांच्या राजकीय अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह येण्याचा संबंध नव्हता.

वाढते वय आणि प्रकृती यामुळे भाऊंचे ५ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले आणि राजकारणासोबत इस्लामपूर शहर हळहळले. काहींच्या घरी चुली पेटल्या नाही. राजकारणातील मातब्बर भाऊ आपल्यात नाहीत यावर कोणाचा विश्वास नव्हता; पण ईश्वर आज्ञेपुढे कोणाचे काही चालत नाही. लोक आजही म्हणतात ‘असा धुरंधर राजकारणी पुन्हा होणे नाही.’

आदरणीय विजयराव गणपतराव पाटील (भाऊ) यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

Web Title: Diligent leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.