मार्केट यार्डात डिजिटलचा बाजार
By Admin | Updated: July 31, 2015 01:11 IST2015-07-31T01:10:55+5:302015-07-31T01:11:11+5:30
बाजार समिती निवडणूक : उमेदवारांमध्ये पोस्टर युद्ध; व्यापाऱ्यांच्या दारी नेत्यांची बारी

मार्केट यार्डात डिजिटलचा बाजार
अंजर अथणीकर / सांगली
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्यानिमित्ताने येथील मार्केट यार्डमध्ये डिजिटल्सचा बाजार झाला आहे. प्रत्येक गल्ल्या, दुकाने उमेदवारांच्या डिजिटलनी झाकोळली आहेत. रिक्षामधूनही ध्वनिक्षेपकाद्वारे जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे बाजार समितीचा प्रचार सुरुवातीलाच शिगेला पोहोचल्यासारखे दिसत आहे. उमेदवारांच्या गाठीभेटीने सभासद व्यापारी वैतागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
व्यापारी प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी १३ उमेदवार, तर हमाल-तोलाईदारमधून एका जागेसाठी ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाजार समितीच्या इतिहासात तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये चेंबर आॅफ कॉमर्सला अपयश आले. निवडणुकीच्या रिंगणात चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष नितीन पाटील, आर. टी. कुंभार, विवेक शेटे, अशोक पाटील, सुनील पट्टणशेट्टी, अभय मगदूम, मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, मोहन माने, विकास मोहिते, महेंद्र तोष्णिवाल आदी तेरा उमेदवार आहेत. त्याचबरोबर हमाल तोलाईदारच्या एका जागेसाठी पाच जण रिंगणात आहेत.
व्यापारी प्रतिनिधीसाठी सुमारे तेराशे मतदार असून, यामधील हजार मतदार हे केवळ मार्केट यार्डमध्ये आहेत. जत, कवठेमहांकाळ, मिरज व विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये तीनशे मतदार आहेत. तीन तालुके फिरण्यापेक्षा सर्वांनी सध्या मार्केट यार्डमध्येच लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रत्येकी चार ते पाच डिजिटल मार्केट यार्डमध्ये उभी केल्याने संपूर्ण मार्केट यार्ड परिसर डिजिटलनी झाकोळला आहे. चार दिवसांपूर्वी महापालिकेने मोहीम उघडून सर्व डिजिटल हटविली होती. आता उमेदवारांनी बाजार समिती व महापालिकेची रितसर परवानगी काढून पुन्हा डिजिटल उभारल्यामुळे वाहतुकीसही अडथळा होत आहे.
तेराही उमेदवार सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यापारी मतदारांच्या दुकानांमध्ये जाऊन गाठीभेटी घेत आहेत. काहींनी घरोघरीही गाठीभेटी सुरु केल्याने, अनेक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी सध्या अनुपस्थित राहणेच पसंत केले आहे. उमेदवारांनी देवदर्शनासाठी देवस्थानच्याही वाऱ्या वाढविल्या आहेत. हमाल तोलाईदार मतदार संघातील उमेदवारांनी डिजिटल तर उभारली आहेतच, शिवाय रिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारेही प्रचार सुरु केला आहे. मार्केट यार्डमध्ये बाळासाहेब बंडगर, गजानन शिंदे, संभाजी सलगर आदींनी हमाल तोलाईदार मतदार संघात प्रचार सुरु केला आहे.