दिघंची-हेरवाड रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:26+5:302021-03-05T04:25:26+5:30
घाटनांद्रे : महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडला जाणारा दिघंची-हेरवाड रस्त्याचे घाटनांद्रे परिसरात अगदी निकृष्ट दर्जाचे काम होत ...

दिघंची-हेरवाड रस्त्याचे काम निकृष्ट
घाटनांद्रे : महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडला जाणारा दिघंची-हेरवाड रस्त्याचे घाटनांद्रे परिसरात अगदी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिक व प्रवासीवर्गातून होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता ते केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगर पाचेगावच्या घाटात घाटनांद्रे फाट्याला मिळणाऱ्या दिघंची-हेरवाड राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या जुन्या दगडी संरक्षण बाधंकाम कठड्यालाच वरून केवळ सिंमेट थापून नवे रूप देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या पुलाचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सतर्क वाहनचालकांच्या निदर्शनास आला आहे. संरक्षक कठड्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या कठड्यालगतच डोंगराच्या खोल दऱ्या आहेत. लगतच संरक्षक कठडा असल्याने संरक्षक कठड्याचे काम व्यवस्थितपणे होणे गरजेचे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणिकपणे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, केवळ कामाचा फार्स केला जात असून, केवळ जुन्या दगडी संरक्षण कठड्यालाच सिमेंट फासले जात असल्याचा आरोप होत आहे.