दिगंबर जाधवचा गोळीबार
By Admin | Updated: October 31, 2015 00:34 IST2015-10-31T00:34:02+5:302015-10-31T00:34:14+5:30
सांगलीतील घटना : स्थायी सभापती संतोष पाटील, जाधव यांच्यासह दहा जणांना अटक

दिगंबर जाधवचा गोळीबार
सांगली : येथील खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव व महापालिका स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला जागेचा वाद शुक्रवारी पुन्हा उफाळून आला. पाटील जागेचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर जाधव यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत तीनवेळा गोळीबार केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.
संजयनगरकडे जाणाऱ्या रेल्वे ब्रीजजवळ शिंदे मळ्यात सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी जाधव व पाटील यांच्या गटाने संजयनगर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटांच्या २० जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. जाधव व पाटील यांच्यासह दहाजणांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये जाधव गटाचे दिगंबर गणपतराव जाधव (वय ५७), त्यांचा भाऊ दिलीप गणपतराव जाधव (६३), दीपक गणपतराव जाधव (५५), पुतण्या रणजित दिलीप जाधव (३०, सर्व रा. खणभाग, सांगली), तर पाटील
गटाचे सभापती संतोष शिवदास पाटील (३९, सह्याद्रीनगर, सांगली), जागेचे मूळ मालक विकास बाजीराव गोंधळे (४६), आशिष बाजीराव गोंधळे (४६),
प्रगती अशोक काटे (५४), साधना शंकर कांबळे (५१),अभिजित विकास गोंधळे (२८, सर्व रा. सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. जाधव गटातील अझर बारस्कर व पाटील गटाचे यासीन मुजावर, अमित रसाळे या तिघांना अद्याप अटक केली नाही. याशिवाय दोन्ही गटांच्या फिर्यादित तीन ते चार अनोळखी संशयितांचाही समावेश आहे. अटकेतील संशयितांना पोलीस ठाण्यात फरशीवर बसविण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
संशयित विकास गोंधळे यांची शिंदे मळ्यात दहा हजार चौरस फूट जागा आहे. यातील पाच हजार चौरस फूट जागा रिकामी आहे. उर्वरित पाच हजार चौरस फुटांमध्ये त्यांचे महाराष्ट्र गॅस एजन्सीचे गोदाम होते. गोंधळे यांचे हे गोदाम दिगंबर जाधव यांनी २००६ मध्ये नऊ वर्षांचा करार करून वापरासाठी घेतले होते. करारापोटी जाधव यांनी गोंधळे यांना आठ लाख रुपये दिले होते. त्यानंतर २०१४ मध्ये संतोष पाटील यांनी गोंधळे यांची ही जागा खरेदी केली. जाधव यांची गोदामाच्या कराराची मुदत २७ आॅक्टोबर २०१५ ला संपली आहे. त्यामुळे पाटील शुक्रवारी सकाळी या जागेवर तारेचे कुंपण घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव व त्यांच्या कुटुंबाने त्यांना विरोध केला. जागेचा ताबा पाहिजे असेल, तर २५ लाख रुपये दे, अशी मागणी जाधव यांनी केली. पाटील यांनी कागदपत्रानुसार जागा माझ्या नावावर आहे, असे सांगितले. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. मारामारी होणार असे वाटल्याने जाधव यांनी रिव्हॉल्व्हरमधून माझ्या दिशेने तीनवेळा गोळीबार केला असल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा जमाव जमविणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
दिगंबर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जागेचे मालक गोंधळे यांच्याकडे माझे ३३ लाख रुपये आहेत. मोकळी जागा व गोदामावर माझा ताबा आहे. त्यामुळे संतोष पाटील यांचा काडीमात्र संबंध नाही; पण पाटील व त्यांच्या समर्थकांनी काठी, लोखंडी पहार घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वादात गोंधळे यांनीही उडी घेतली. त्यामुळे वाद वाढत गेला, असे म्हटले आहे. पाटील गटाविरुद्धही खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
जाधवांकडून फोनाफोनी
गोळीबार केल्यानंतर स्वत: जाधव यांनी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष व प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींना फोनाफोनी करून याची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, अधीक्षक प्रकाश गायकवाड, निरीक्षक रवींद्र डोंगरे हे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जाधव-पाटील यांच्यासह समर्थकांना ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतले; पण त्यांनी कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याने निरीक्षक डोंगरे यांनी कारवाईचा बडगा उगारला.
राजकीय नेत्यांची हजेरी
जाधव व पाटील हे दोघे राजकीय नेते आहेत. त्यांना पोलिसांनी पकडून नेल्याचे समजताच अनेक नगरसेवक व राजकीय पदाधिकारी संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. काहीजणांनी वाद मिटविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; पण निरीक्षक डोंगरे यांनी कुणालाही दाद दिली नाही. अगदी पोलीस ठाण्यात का आला आहे, काय काम आहे, असे म्हणून साऱ्यांची फिरकी घेतली. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पळताभूई थोडी झाली.
‘व्हिडिओ क्लिप’ प्रसारित
जाधव गोळीबार करीत असताना व रिव्हॉल्व्हरमधून गोळी कशी बाहेर पडली, याचे एकाने मोबाईलवर चित्रीकरण केले आहे. सात सेकंदाच्या या चित्रीकरणाचा सायंकाळपर्यंत सोशल मीडियावरून प्रसार झाला. चित्रीकरण कोणी केले, याचा पोलीस शोध घेत आहेत.
रिव्हॉल्व्हर जप्त
जाधव यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे; पण त्यांच्या रिव्हॉल्व्हरचा परवाना होता का, याची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी होईल, असे निरीक्षक डोंगरे यांनी सांगितले. ते म्हणाले, जाधव यांनी रिव्हॉल्व्हरचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांचा परवाना रद्दचा प्रस्ताव सादर केला जाईल.
तीन दिवसांपूर्वी हसत-खेळत
प्Þोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड म्हणाले, गेल्या आठवड्यात जाधव यांनी जागेचा वाद असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आम्ही तीनच दिवसांपूर्वी जाधव व संतोष पाटील यांना समोरासमोर बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. मात्र, ही बाब दिवाणी असल्याने त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. भविष्यात जागेच्या वादातून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीसही बजावली होती. आमच्यासमोर दोघेही हसत-खेळत आले होते. तसेच हसत-खेळत बाहेर पडले होते.