सांगलीत सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीस अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:00+5:302021-08-15T04:27:00+5:30
सांगली : सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीला अडचणी येत आहेत. कोरोनामुळे अगोदरच कामात असलेल्या अडचणीत यंत्रणा बंद ...

सांगलीत सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीस अडचणी
सांगली : सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीला अडचणी येत आहेत. कोरोनामुळे अगोदरच कामात असलेल्या अडचणीत यंत्रणा बंद पडत असल्याने दस्त नोंदणीसाठी कार्यालयाबाहेर गर्दी होत आहे. एनआयसीने यंत्रणेतील दोष दूर केल्यास नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे.
जमीन खरेदी, दुकाने, फ्लॅट खरेदीसह भाडेकरार, बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र करण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात नेहमीच गर्दी असते. सांगलीतील सहाय्यक निबंधक कार्यालयात दिवसाला सरासरी ४० दस्तनोंदणी होत आहे. कोरोनाअगोदर सर्व्हर डाऊनच्या अडचणी नव्हत्या, त्यावेळी याच नोंदी ७० ते ८० वर जात होत्या.
नोंदणीचे काम ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्यापासून सर्व्हर डाऊनची समस्या कायम आहे. मध्यंतरी क्लाऊड बदलल्यानंतर काहीकाळ नोंदीतील अडचणी दूर झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा सर्व्हर सुरु असला तरच नोंदणीची प्रक्रिया होत आहे.
सर्व्हर सुरु असला तरी अनेकवेळा त्याची गती कमी असल्याने नोंदीसह फोटो अपलोड करण्यास अडचणी येतात. शिवाय फोटो घेतला तरी तो योग्य दर्जाचा नसल्याने पुन्हा नोंदणीची कसरत करावी लागत आहे.
या आठवड्यात सांगलीतील सहाय्यक निबंधक कार्यालयात तीन दिवस हीच समस्या येत होती. यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही कामाचा निपटारा करण्यात अडचणी येत आहेत.
तांत्रिक अडचण नसली तर एका दस्तनोंदणीला पंधरा मिनिटे ते अर्धा तास लागतो. यापेक्षाही कमी कालावधीत अनेकवेळा नोंदणी होत असते. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यास याच कामासाठी अर्धा दिवस जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे दस्त नोंदणीतील या अडचणी दूर करण्याची मागणी होत आहे.
चौकट
यापूर्वी लहान जागेत असलेले सहाय्यक निबंधक कार्यालय आता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे कार्यालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचेही पालन होताना दिसत नाही.