म्हैसाळ योजनेच्या थकबाकीवरून मतभेद
By Admin | Updated: October 3, 2015 23:48 IST2015-10-03T23:48:27+5:302015-10-03T23:48:27+5:30
संतप्त प्रतिक्रिया : शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर बोजा चढविण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध

म्हैसाळ योजनेच्या थकबाकीवरून मतभेद
सांगली : मिरज, कवठेमहांकाळ, तासगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या थकबाकीच्या मुद्द्यावरून लाभक्षेत्रातील शेतकरी व लोकप्रतिनिधींतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात कृष्णा खोरे प्रशासनाने आवर्तनाची थकबाकी थेट शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढवण्याची प्रक्रिया चालू केल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, शेतकऱ्यांनी फुकटच्या पाण्याचा सोस सोडला तरच योजना पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असल्याचे सांगितले, तर शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढवण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला मात्र कडाकडून विरोध दर्शवला.
प्रतिसादावर योजना अवलंबून...
याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या माध्यमातून चार तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होत असताना योजना चालू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद मात्र अत्यल्प आहे. आवर्तन सुरू करण्याच्या अगोदर प्रशासनाच्यवतीने जाहीर प्रकटने, गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्याकडून मागणी अर्ज भरून घेतले जातात. या प्रक्रियेसही शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळतो आहे. आजअखेर टंचाई निधीतून ३६ कोटी रुपयांची थकबाकी अदा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून मात्र वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा दर बघितला तर पिण्याच्या पाण्याची बाटली २० रुपयांना मिळत असताना म्हैसाळ योजनेतील १० हजार लिटर पाण्याला १३ रुपये दर आकारण्यात येतो. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नातील केवळ ५ टक्के रक्कम अदा केल्यास योजना चालवण्यास अडचण येणार नाही. वसुलीला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरच योजना अवलंबून आहे.