खटावला दूषित पाण्याने शंभरजणांना अतिसार
By Admin | Updated: December 23, 2015 01:22 IST2015-12-23T00:53:25+5:302015-12-23T01:22:40+5:30
तलावातील पाण्याचा परिणाम : शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा

खटावला दूषित पाण्याने शंभरजणांना अतिसार
मिरज : तालुक्यातील खटाव येथे यल्लम्मादेवीच्या यात्रेदरम्यान तलावातील दूषित पाणी पुरवठ्यामुळे सुमारे शंभरजणांना अतिसाराची लागण झाल्याची घटना घडली. ताप, जुलाब, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांवर मिरज तालुक्यातील खटाव, आरग, अथणी तालुक्यातील मदभावी, केंपवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
खटाव येथे तीन दिवसांपूर्वी यल्लम्मादेवीची यात्रा पार पडली. यात्रेसाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. यात्रेदरम्यान गावात लिंगनूर हद्दीत विहिरीतून नळपाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र यात्रेदरम्यान गावात आलेल्या जादा लोकांसाठी विहिरीशेजारी असलेल्या तलावातून पाणी विहिरीत सोडण्यात आले. तलावातील दूषित पाण्यावर शुध्दीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा करण्यात आल्याने गावातील शेकडोजणांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. डोकेदुखी, ताप, जुलाब, उलट्या या लक्षणांमुळे खटावसह आरग, मदभावी, केंपवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गावातील सचिन जताण्णावर, शैलेश जताण्णावर, गणेश खटावकर, गोविंद चंदूरकर यांच्यासह अन्य रुग्णांवर उपचार करण्यात आले. अतिसाराच्या साथीमुळे तलावातील पाणीपुरवठा बंद करून पुन्हा विहिरीतून शुध्दीकरण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवस गावात सुरू असलेली अतिसाराची साथ नियंत्रणात आहे. मात्र पंचायत समिती आरोग्य विभागाचे अधिकारी खटावकडे फिरकले नसल्याचे सांगण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, या अतिसाराच्या साथीबाबत माहिती नसल्याचे सांगितले. आरग प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. धेंडे यांनी गावातील पाण्याचे नमुने तपासणी व रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
दुष्काळामुळे पातळी कमी : विहिरीतून पुरवठा
कर्नाटक सीमेवर असलेल्या खटाव गावाला लिंगनूर हद्दीतील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. अवर्षणामुळे विहिरीशेजारी असलेल्या तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. पाण्याने तळ गाठला असल्याने शिल्लक असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा होती. खटावचे उपसरपंच रावसाहेब बेडगे यांनी मात्र गावात दूषित पाणीपुरवठा झाला नाही व आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात अतिसाराचे रुग्ण आढळले नसल्याचे सांगितले.