राजेवाडी एक्स्चेंजमधील ‘डायलटोन’ गप्पच!
By Admin | Updated: February 16, 2015 23:11 IST2015-02-16T21:55:57+5:302015-02-16T23:11:48+5:30
फोन संख्या घटली : सेवा मोडकळीस, दूरध्वनी केवळ बिलास भार

राजेवाडी एक्स्चेंजमधील ‘डायलटोन’ गप्पच!
लक्ष्मण खटके - लिंगीवरे राजेवाडी एक्स्चेंजमधील वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे लिंगीवरे, राजेवाडी येथील सुमारे ९० टक्के लॅँडलाईन फोन ग्राहकांनी बंद केले आहेत. ‘डायलटोन’ वारंवार गप्प होत असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत उरलेले दूरध्वनी कनेक्शनही केवळ बिल भरण्यापुरतेच राहिले आहेत.आटपाडी तालुक्यात राजेवाडी एक्स्चेंज जिल्ह्याच्या व तालुक्याच्या शेवटच्या व दुर्गम टोकाला आहे. गेल्या बारा वर्षांपूूर्वीपासून सुरू करण्यात आलेल्या एक्स्चेंजमध्ये बापूराव साठे नामक आॅपरेटर स्वतंत्रपणे नेमण्यात आला होता. त्यावेळी सुमारे १९५ फोनधारक तयार ग्राहक करून ग्राहकसेवा चोखपणे बजावली जात होती. अधूनमधून बिघाड झाल्यास राजेवाडी येथे एक्स्चेंजमध्येच फोन केला की लगेच दुरुस्तीबाबत प्रयत्न करून दूरध्वनीची सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात येत होती. राजेवाडी एक्स्चेंजला जोडणारी केबल दिघंची येथून जमिनीखालूून आणली आहे. या भागात अलीकडे शेतकऱ्यांनी कालव्यांमधून जमिनीखालून जलवाहिन्या टाकण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. अनेकदा जमिनीत जलवाहिनी टाकण्यासाठी खुदाई करताना ही केबल तुटली जाते. पुन्हा जोड दिल्यानंतर त्यामध्ये पाणी, चिखलाची राड जाऊन सेवा सुरळीत मिळणे अवघड जाते. बीएसएनएलने कायम सेवेतील आॅपरेटर काढल्यानंतर कंत्राटी स्वरुपात कामगारांना ठेका दिला. परंतु कमी उत्पन्न आणि काम जास्त यामुळे कामगारांची कुचंबणा होऊ लागली. अन्य एक्स्चेंजच्या आॅपरेटरला जादा काम करण्यास लावून कामाचा बोजा वाढला. तसेच वारंवार विस्कळीतपणा येऊन त्यांना काम करणे अवघड झाले. त्यामुळे लॅँडलाईन सेवेतील पूर्ण विश्वास नष्ट होऊन सर्रास ग्राहकांनी केवळ भुर्दंड सहन करण्यापेक्षा फोनसेवा बंद केली व मोबाईल सेवेचा आधार घेतला. वाढत्या मोबाईलमुळे दूरध्वनी फोनला पूर्णविराम मिळाला. आज १६५ पैकी केवळ दोनच फोन सेवा लिंगीवरे येथे नाईलाजाने रेकॉर्डवर सुरू आहेत. प्रत्यक्षात मात्र एकदाही फोन करण्यास व येण्यास याचा फायदा होत नाही. राजेवाडी गावातही अशीच स्थिती झाली आहे. एकूणच या साऱ्या प्रकारांबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट कनेक्शनसाठी टेलिफोन सुरू ठेवण्यात आला आहे. परंतु त्याचा कधीही लाभ झाला नाही. ही सेवाही नियमितपणे चाललीच नाही.
- आगतराव खांडेकर,
सरपंच, लिंगीवरे
‘लोकमत’चा पाठपुरावा
बंद असलेल्या फोनचे बिल वाढले म्हणून न्यायालयातून ग्राहकांना नोटिसा बजावण्यात आल्या. नाहकपणे ग्राहकांनी व्याजासह पैसे भरल्याशिवाय पर्यायच उरला नाही. या एक्स्चेंजमधील ग्राहकांनी फोन केले नसले तरी, कॉल नोंदी होऊन चार्ज भरावे लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यावरही ‘लोकमत’ने आवाज उठविला होता.
फोन बंद, बिलिंग सुरू
राजेवाडी एक्स्चेंजमधील फोन कायम बंदच आहेत. दुरुस्तीसाठी आटपाडी येथील कार्यालयात फोन केल्यापुरता फक्त एखादा दिवस फोन सुरू असतो. पुन्हा फोन नादुरुस्तच असतो. मात्र बिल हे नियमितपणे येणे सुरूच असते.