मिरज : धुळे येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी मिरजेत खॉजावस्तीत एका तरुणासोबत सापडली. हा लव्ह जिहाद प्रकार असल्याची तक्रार करीत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिसांनी संबंधित मुलीस धुळे पोलिसांच्या ताब्यात दिले.संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मामाकडे मिरजेत आली होती. याचवेळी खाजा वस्तीतील एका तरुणासोबत तिचे सूत जुळले. मुलगी धुळे येथे परत गेल्यानंतर तेथून काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी धुळे पोलिसांत दिल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून मुलगी मिरजेत असल्याचे समजले.याबाबत सूचना मिळाल्याने मिरजेत गांधी चौक पोलिसांनी त्या मुलीस व तरुणास ताब्यात घेतले. मुलीच्या नातेवाइकांनी मुलीस फूस लावून खोटे सांगून तिला पळवून आणल्याची तक्रार करीत मिरजेत हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. माजी आमदार नितीन शिंदे, शिव प्रतिष्ठानचे विनायक माईकर, बजरंग दलाचे आकाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. बनावट जन्म दाखला व आधार कार्ड काढून अल्पवयीन मुलीसोबत लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याने तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लव्ह जिहाद असल्याची तक्रार करीत हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पावित्रा घेतला. मात्र, याबाबत धुळे पोलिसांत तक्रार दाखल असल्याने गांधी चौक पोलिसांनी दोघांनाही धुळे पोलिसांच्या ताब्यात दिले.
धुळ्याची अल्पवयीन मुलगी मिरजेत तरुणासोबत सापडली, हिंदुत्ववादी संघटनांची लव जिहादची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:35 IST