सकाळी साडेदहा वाजता देसाई गटाकडील संजय देसाई, जालिंदर देसाई, माधव देसाई न्यायालयात दावा सुरू असलेल्या ढालगाव येथील जमिनीमध्ये जेसीबी घेऊन काम करण्यासाठी आले होते. यावेळी घागरे गटाकडील रविकिरण सुब्राव घागरे, संदीप दादा घागरे, विशाल घागरे, अजय घागरे यांनी या जमिनीचा दावा सुरू असून, काम करू नका, कायदेशीररीत्या काम करण्यास या, असे सांगितले, परंतु देसाई गटाकडील महादेव देसाई, संजय देसाई त्यांनी ऐकले नाही. त्यांनी जेसीबी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. रविकिरण घागरे यास मागून डोक्यात दगड घातला, असे फिर्यादी रविकिरण घागरे याने फिर्यादीत म्हटले आहे.
यामध्ये दोन्ही गटांकडून माणसे जमली आणि वादाला सुरुवात झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या हाणामारीत घागरे गटाकडील चार ते पाच जणांनी संजय देसाई, तसेच महादेव देसाई यांनाही दगडाने मारहाण केली. देसाई गटाकडून माधव देसाई यांनी फिर्याद दिली आहे. आम्ही खरेदी केलेल्या जमिनीत मुरुम काढण्याचे काम करण्यासाठी गेलो असता, घागरे गटाच्या चार ते पाच जणांनी दगडाने मारहाण केल्याचे देसाई यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रविकिरण घागरे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, संजय देसाई आणि माधव देसाई हेही जखमी आहेत.
कवठेमंकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे तपास करीत आहेत.