देवेंद्र फडणवीस मंगळवारी खानापूर-आटपाडी दौऱ्यावर
By Admin | Updated: October 25, 2015 00:42 IST2015-10-25T00:42:17+5:302015-10-25T00:42:17+5:30
कामांची पाहणी होणार : अग्रणीसह जलयुक्त शिवाराला भेट

देवेंद्र फडणवीस मंगळवारी खानापूर-आटपाडी दौऱ्यावर
विटा : दुष्काळी खानापूर विधानसभा मतदारसंघात विविध जलसंधारण कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, दि. २७ आॅक्टोबरला खानापूर व आटपाडी तालुक्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकीयदृष्ट्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
खानापूर तालुक्यात लोकसहभाग व शासनाच्या सहकार्यातून अग्रणी नदीपात्राचे सुमारे २० कि.मी.चे रूंदीकरण व खोलीकरण करून पुनरुज्जीवन केले आहे. राज्यातील या आदर्श अग्रणी पॅटर्नची व आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी, पिंपरी बुद्रुक येथील जलयुक्त शिवार योजनेची पाहणी फडणवीस करणार आहेत. तेथून खानापूर तालुक्यातील सुलतानगादे, तामखडी फाटा, जाधववाडी, विठ्ठलनगर, बलवडी (खा.), बेणापूर येथील अग्रणीच्या कामांची पाहणी करतील. त्यानंतर ते जतकडे जाणार आहेत. (वार्ताहर)
पडळकरवाडीतून होणार सुरूवात
फडणवीस यांचे मंगळवारी सकाळी १० वाजता आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. सकाळी १० ते १०.२० पर्यंत पडळकरवाडी व पिंपरी बुद्रुक येथील जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामांची पाहणी, त्यानंतर सकाळी अकरापर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी ११.४० वाजता सुलतानगादे (ता. खानापूर) येथील पुलावरून अग्रणी नदीच्या कामाची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी १.२० वाजेपर्यंत तामखडी फाटा, जाधववाडी चौक, पवार मळा येथे लोकसहभागातून झालेल्या कामांची पाहणी करतील. पवार मळा (बलवडी) येथे भवानी मंदिराजवळ शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर शिवेवरचा बंधारा, विठ्ठलनगर व बेणापूर येथे अग्रणी नदीच्या कामाची पाहणी करून दुपारी तीन वाजता जत तालुक्यातील बिरनाळकडे प्रयाण करणार आहेत. तेथेही सिमेंट नालाबांध कामांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून ते थेट सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत.