मानसिंगराव नाईक यांनी स्वर्गीय लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली विश्वास साखर कारखान्यात जातीने लक्ष घालून काही दिवसातच कारखाना नावारूपास आणला आहे. कारखान्यात कमी खर्चात नवनवीन सोईसुविधा निर्माण केल्या. चांगला उतारा, चांगला दर ही विश्वासची ख्याती राहिली आहे. कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाऊंनी उपपदार्थ निर्मिती सुरू केली आहे. याची दखल घेत, राज्य सरकार, केंद्र सरकार, साखर संघ यांच्याकडून विश्वास कारखान्यास विविध प्रकारचे शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर, विराज अल्कोहोल, विश्वास शिक्षण संस्था, प्रचिती दूध संघ, आपला बझार, सूतगिरणी, महिला बचत गट, यासह अनेक उद्योग-व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. व्यवसाय कोणता असावा आणि तो कसा चालवावा, हे भाऊंकडूनच शिकावे, एवढी मोठी शक्ती त्यांनी निर्माण केली आहे.
राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडून मिळणारा सर्व प्रकारचा निधी कसा ओढून आणायचा, हे भाऊंना पक्के माहीत असल्याने गाव, वाडी, वस्तीवर आज लाखो रुपयांची विकासकामे झाली असून, त्याच्या दुपटीने सुरू आहे. भाऊंच्या काळात २५/१५ ची जी कामे झाली, ती महाराष्ट्रात कुठेही झाली नसतील, एवढी कामे झाली आहेत. वाकुर्डे बुद्रुक योजना, वारणा डावा कालवा, अनेक उपसा जलसिंचन योजनांना मंजुरी आणि निधी मिळवून देत कामे मार्गी लावली आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाऊंच्या काळातच वाकुर्डे योजना पूर्ण करण्याचे सांगितल्याने भाऊंच्या कार्यकाळात सगळ्या शिवारात पाणी फिरणार, असे लोक ठामपणे सांगू लागले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने शिराळा तालुक्यात औद्योगिक क्रांती उभी राहत आहे. नवनवीन शिकण्याची असलेली प्रचंड इच्छा आणि त्याचा मतदारसंघातील जनतेसाठी होणारा फायदा याचा सातत्याने विचार करणारे, तरुणांना ऊर्जा देणारे, नवा कार्यकर्ता घडविणारे नवीन उद्योग-व्यवसाय यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अशा आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-शिवाजी पाटील कोकरुड.