महावितरण कामगार संघटनांचा वीज बिल थकबाकीमुक्तीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:28+5:302021-09-19T04:26:28+5:30
सांगली : कोरोना महामारी व महापूर या काळात वाढलेल्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. महावितरणचे ...

महावितरण कामगार संघटनांचा वीज बिल थकबाकीमुक्तीचा निर्धार
सांगली : कोरोना महामारी व महापूर या काळात वाढलेल्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासाठी थकीत वीजबिल वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या अनुषंगाने महावितरणच्या वीज कामगार -अधिकारी संघटनांनी एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी शून्य करण्याचा निर्धार केला आहे.
सांगली जिल्ह्यात महावितरणची थकीत वीजबिल ४२४ कोटी झाली आहे. थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महावितरणचा कारभार करणे कठीण झाले आहे. महावितरणला दैनंदिन कारभार व वीज खरेदीकरिता नियमित अर्थपुरवठा होणे गरजेचे आहे. दरमहा वीजबिल वसुलीच्या महसुलावरच महावितरणची भिस्त अवलंबून असल्यामुळे या कठीणकाळात १०० टक्के वीजबिल वसुली होणे आवश्यक आहे. ग्राहकांना अखंडित, दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा देण्याची जबाबदारी महावितरणवर आहे. तेव्हा वीज ग्राहकांनाही आपली मासिक वीजदेयके नियमित भरणा करून महावितरणला ही जबाबदारी पेलण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, वीज कामगार संघटनांच्या पुढाकारातून सांगली मंडळ कार्यालयात वीजबिल थकबाकी सद्य:स्थिती व वसुलीसाठीचे नियोजन चर्चा झाली. संघटना प्रतिनिधींनी जिल्ह्यात वीजबिल वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून महावितरण कंपनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.