लाखो रुपये खर्चूनही शिराळ्यात सभापतींचे निवासस्थान कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:42+5:302021-08-22T04:29:42+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा पंचायत समितीच्या सभापतीसाठी येथील बसस्थानकानजिक सभापती निवास बांधले होते. मात्र या ...

लाखो रुपये खर्चूनही शिराळ्यात सभापतींचे निवासस्थान कुचकामी
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा पंचायत समितीच्या सभापतीसाठी येथील बसस्थानकानजिक सभापती निवास बांधले होते. मात्र या निवासस्थानाला प्रचंड अवकळा आली आहे.
पूर्वी येथे धर्मशाळा होती. १५ वर्षांपूर्वी येथे सभापतींना राहण्यासाठी हे निवासस्थान उभारण्यात आले. सभापतींच्या कामकाजासाठी सुलभता यावी, जनतेला सभापतींना भेटता यावे, हा यामागील उद्देश होता. यामुळे लाखोंचा खर्च करून ही इमारत उभी केली गेली; पण याचा उपयोग तत्कालीन सभापती ॲड. भगतसिंग नाईक वगळता कोणी केला नाही. तालुक्याचा इतिहास पाहता, सभापती हे शिराळ्यापासून पश्चिम, उत्तर व दक्षिण भागातील झाले. वास्तविक त्यांना या निवासस्थानाचा उपयोग करणे जास्त सोयीचे होते. परंतु काही अपवाद वगळता याचा उपयोग केला गेला नाही.
गेली कित्येक वर्षे याकडे पंचायत समितीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यामुळे ही इमारत मोक्याच्या ठिकाणी असूनसुध्दा अखेरचा श्वास घेत आहे. इमारत पूर्णपणे गळत आहे. साप, कुत्री, डुकरे यांचा मुक्तसंचार असतो. आसपासची मंडळी या जागेत पार्किंग, मुतारी म्हणून वापर करीत आहे. रात्रीच्यावेळेस मद्यपींना ही जागा सोयीस्कर ठरली आहे. एवढा प्रदीर्घ कालावधीत एकाही सभापतीने या विषयावर पाठपुरावा केला नाही.
ही लाखो रुपयांची इमारत एकीकडे अंतिम घटका मोजत आहे; तर दुसरीकडे सभापतींंना त्यांच्या गावाकडून पंचायत समिती कार्यालयात आणण्यासाठी गाडीचा खर्च सुरूच आहे.
चाैकट
शासनाने लक्ष द्यावे
शासनाने याकडे लक्ष न दिल्यास येथे अतिक्रमणांचा विळखा घट्ट होणार असून, या मोक्याच्या जागेचे काय होईल, हे सांगता येणार नाही. शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा काय असतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.