‘महायुती’साठीच इच्छुक सरसावल

By Admin | Updated: August 17, 2014 22:35 IST2014-08-17T22:26:52+5:302014-08-17T22:35:49+5:30

जोरदार फिल्डिंग : खानापूर-आटपाडी मतदारसंघातील चित्रे

Desperate for 'Mahayuti' Sasawal | ‘महायुती’साठीच इच्छुक सरसावल

‘महायुती’साठीच इच्छुक सरसावल

अविनाश बाड -आटपाडी --खानापूर—आटपाडी विधानसभा मतदारसंघातून यावेळी कधी नव्हे ती महायुतीची उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडून, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि खासदार संजय पाटील यांच्यामार्फत ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यात कोण बाजी मारणार, याबद्दल मतदार संघामध्ये उत्सुकता आहे.
माजी आमदार अनिल बाबर यांना यावेळी राष्ट्रवादीतून उमेदवारी करण्याची संधी मिळत नसल्यानेच त्यांनी शिवसेनेचा जय महाराष्ट्र केला, असा आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आटपाडीतील जाहीर सभेत केला आहे. गृहमंत्री पाटील आणि बाबर यांचे बंधुप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांनी बाबर यांना राष्ट्रवादीची (बंडखोरीची) उमेदवारी देण्यासाठी ताकद पणाला लावली होती. पण आता राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था पाहता, पक्षश्रेष्ठींनी ताकसुध्दा फुंकून प्यायला सुरुवात केल्याने बाबर यांच्याऐवजी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले. त्यामुळे बाबर यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले.
बाबर यांचा आटपाडीत गट आहे. खानापूर पंचायत समितीवर त्यांचे वर्चस्व आहे. मात्र विसापूर गटातून त्यांना कोण मदत करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह नेत्यांच्या चर्चेवेळी उमेदवारी देण्याचा शब्द घेतल्यानंतरच त्यांनी जय महाराष्ट्रची घोषणा केली असणार, हे गृहीत धरले जात आहे. उमेदवारी मिळविण्यात बाबर यांचा हातखंडा आहे. मात्र असे असले तरी, गेल्या निवडणुकीत सगळी राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती. ज्या देशमुख गटाने त्यांना आटपाडी तालुक्यातून मताधिक्य दिले होते, त्या गटाचे अमरसिंह देशमुख आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खानापूर तालुका आणि विसापूर मंडलमधील राष्ट्रवादीची नेतेमंडळी कुणाच्या पाठीशी राहणार, यावरही बाबर यांचे निवडणुकीतील भवितव्य अवलंबून राहणार आहे.
रासपाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांची गेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी निवडणुकीचा निकाल बदलवणारी ठरली. गेल्या वर्षभरापासून त्यांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून टाकले आहे.
प्रस्थापित नेत्यांवर कडाडून टीका करण्याचे धाडस त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तरुणांचा ओढा आकर्षित करणारे नेतृत्व मात्र अलीकडे अनेक गुन्ह्यात अडकलेले आहे. लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांचे ते स्टार प्रचारक होते. त्यामुळे खासदार पाटील यांनी अनेक जाहीर कार्यक्रमात पडळकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे.
रासपच्या गोपीचंद पडळकरांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार संजय पाटील, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत ही मंडळी प्रयत्नशील असल्याचा दावा ‘रासप’चे कार्यकर्ते करत आहेत. आता बाबर आणि पडळकर हे दोन्हीही नेते आक्रमक आहेत. मात्र पडळकर यांना तिकीट नाकारले तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे व्यक्त केला आहे.
त्यामुळे महायुतीची उमेदवारी जर बाबर यांना मिळाली, तर खासदार संजय पाटील यांच्यासह महायुतीची नेतेमंडळी बाबर यांच्या, की पडळकर यांच्या पाठीशी उभी राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Desperate for 'Mahayuti' Sasawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.