राष्ट्रवादीच्या डोईवर कार्यकर्त्यांच्या निराशेचे ढग
By Admin | Updated: July 27, 2015 00:30 IST2015-07-26T23:18:03+5:302015-07-27T00:30:48+5:30
तासगाव-कवठेमहांकाळमधील स्थिती : आबांच्या पश्चात दोन्ही तालुक्यातील राजकीय गणित बिघडले

राष्ट्रवादीच्या डोईवर कार्यकर्त्यांच्या निराशेचे ढग
दत्ता पाटील- तासगाव -आर. आर. पाटील यांच्या कालावधित तासगाव-कवठेमहांकाळमध्ये भक्कम असणारी राष्ट्रवादी त्यांच्या पश्चात एका दुष्टचक्रात सापडली आहे. गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि सोयीच्या राजकारणामुळे निर्माण झालेले कार्यकर्त्यांच्या निराशेचे ढग आता राष्ट्रवादीची चिंता वाढवू लागले आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे बहुतांश समर्थक राजकीयदृष्ट्या निराशवादी झाल्याचे दिसून येत आहे. आबांचे निष्ठावंत शिलेदार पक्षापासून दुरावत चालल्याचे दिसून येत आहे. याबाबत पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करून वेळीच योग्य निर्णय घेतले गेले नाहीत, तर त्याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. आबांच्या निधनानंतर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात इतक्या झपाट्याने राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर येणे अपेक्षित नव्हते. मात्र काही महिन्यांतच तासगावपाठोपाठ, कवठेमहांकाळ तालुक्यातील पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी उमेदवारीवरून नाराज होत राष्ट्रवादीतील एका गटाने पक्षविरोधी भूमिका घेतली. पक्षातील गटबाजीमुळे एका जागेवर राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. पक्षातील नेतृत्वाविषयी काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे तक्रारी केल्या. आता सांगली बाजार समितीच्यानिमित्ताने कवठेमहांकाळ तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला. तासगावातील काही कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली, तर कवठेमहांकाळच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसला जवळ केले आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाविरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आपला हक्काचा माणूस नसल्याची भावना आहे. अशा कार्यकर्त्यांना भक्कम आधार मिळालाच नाही. आतापर्यंत आर. आर. पाटील यांनी अनेक गट-तट सोबत घेऊन राजकारण केले. त्यांचा शब्द अंतिम असायचा. तसा निर्णय आताच्या नेतृत्वाकडून होत नसल्याची भावना दोन्ही तालुक्यात आहे. मतदारसंघात राष्ट्रवादीचा गड भक्कम असतानादेखील कार्यकर्ते पक्षापासून फारकत घेत असल्यामुळे, पक्षाचे भविष्य कोणाच्या हाती? असाच प्रश्न निर्माण होत आहे.
नेते, कार्यकर्त्यांची फरफट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वपक्षीय फॉर्म्युला, तासगाव बाजार समितीत स्वबळावर लढण्याचा निर्णय आणि आता सांगली बाजार समितीत कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वपक्षीय फॉर्म्युला आणि जागावाटपाचा निर्णय असो, या सर्व गोष्टीत पक्षाच्या नेतृत्वाबरोबरच दोन्ही तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फरफटच होत असल्याची भावना अनेक कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.
खमक्या नेतृत्वाची गरज
आबांच्या पश्चात नेतृत्वाची धुरा सुमनताई यांच्याकडे आली आहे. त्या राजकारणात नवख्या आहेत. त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी थोडा अवधी द्यायला हवा, अशी भूमिका आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. मात्र सद्यस्थितीत राष्ट्रवादी पक्ष ज्या अवस्थेतून जात आहे, अशा परिस्थितीत खमकेपणाने निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. जयंत पाटील यांच्याकडे पालकत्व सोपविले असले तरी, ते काही कार्यकर्त्यांना मान्य होत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे एकूणच गटा-तटाचा विचार करुन सर्वमान्य निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा निराशावाद थांबणार नाही, असेच एकूण चित्र आहे.