माझे काय चुकले हे देशमुखांनीच सांगावे!
By Admin | Updated: July 25, 2014 23:33 IST2014-07-25T23:18:08+5:302014-07-25T23:33:47+5:30
अनिल बाबर : उमेदवारीला राजेंद्रअण्णांचाच नकार

माझे काय चुकले हे देशमुखांनीच सांगावे!
विटा : खानापूर विधानसभेची उमेदवारी आटपाडीला देणार असाल तर माझी संमती असल्याचे मी पक्षश्रेष्ठींना यापूर्वीच सांगितले होते. त्यावेळी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशीही मी उमेदवारीबाबत चर्चा केली होती. चर्चेवेळी त्यांना खानापूर तालुका व विटा शहराशी सातत्याने जनसंपर्क ठेवावा लागेल, असे सुचविले होते. त्यासाठी मीसुध्दा वर्षभर प्रयत्नशील होतो. त्यावेळी राजेंद्रअण्णांनी स्वत:च उमेदवारीस स्पष्ट नकार दिला होता. मात्र, आता अमरसिंह देशमुख यांनी, आमचे काय चुकले आणि आम्ही अचानक कसे शत्रू झालो, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पक्षश्रेष्ठींसमोर झालेली चर्चा व आटपाडीकरांनी मला केलेली मदत लक्षात घेता, मीही त्यांना अन्य पदांवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता माझे काय चुकले, हे देशमुख यांनीच सांगावे, असा सवाल माजी आमदार अनिल बाबर यांनी आज (शुक्रवारी) गार्डी (ता. खानापूर) येथे पत्रकार परिषदेत केला.
बाबर म्हणाले की, मी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजअखेर पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत व्यक्तिगत नुकसान होणार असल्याची माहिती असूनही, पक्षादेश मानून मी आघाडी धर्माचे पालन केले. पक्षनेतृत्वाचा आदेश शिरोधार्ह मानून पक्षशिस्त पाळली. येणारी विधानसभा निवडणूक व राहिलेल्या कालावधीचा विचार करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील व जयंत पाटील यांच्याशी मी उमेदवारीबद्दल चर्चा केली होती. त्या चर्चेत आटपाडीला आपण उमेदवारी देणार असाल तर माझी संमती असल्याचे मी सांगितले होते. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांनी खानापूर तालुका व विटा शहराशी सातत्याने संपर्क ठेवावा, अशी आग्रही मागणीही मी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.
आटपाडीतील नेतृत्वाने मला व पक्षाला केलेली मदत लक्षात घेऊन, आमदारकीपेक्षा ज्या पदाला महत्त्व आहे, त्या व अन्य पदांवर आटपाडीला संधी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले आहेत. विधानसभा उमेदवारीसंदर्भात मी राजेंद्र्रअण्णांशी चर्चा केली होती. त्यावेळी देशमुख यांनी विधानसभेची उमेदवारी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. उमेदवारीबाबत मुंबई येथे पक्षश्रेष्ठींसमोर झालेल्या बैठकीत सर्व चर्चा स्पष्टपणाने झाल्या आहेत. याचा तपशीलही मी देण्यास तयार आहे. मात्र, असे असताना अमरसिंह देशमुख यांनी, आमचे काय चुकले, आम्ही अचानक शत्रू कसे झालो, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही बाबर यावेळी म्हणाले.
मी कुणाचाही शत्रू नाही, कुणालाही शत्रू मानत नाही व भविष्यातही मानणार नाही, पण देशमुख यांचे वक्तव्य जनतेत गैरसमज पसरविणारे आहे. सर्व चर्चा झाली असतानाही व उमेदवारीला राजेंद्रअण्णांनी स्पष्ट नकार दिला असतानाही त्यांनी असे वक्तव्य केल्याने, माझे काय चुकले हे देशमुखांनीच सांगावे, असा प्रतिसवाल बाबर यांनी केला. (वार्ताहर)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला रामराम ठोकून बाबर शिवसेनेचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा खानापूर मतदारसंघात सुरू आहे. त्याबाबत बाबर यांना विचारले असता त्यांनी, थांबा व पहा, एवढेच सांगून या प्रश्नाला बगल दिली.