जिल्हा बॅँकेतील विजयाने देशमुख गट रिचार्ज
By Admin | Updated: May 12, 2015 23:43 IST2015-05-12T23:28:05+5:302015-05-12T23:43:29+5:30
आटपाडीत समर्थकांचा जल्लोष : देशमुखवाडा गुलालात न्हाला, कार्यकर्त्यांत उत्साह

जिल्हा बॅँकेतील विजयाने देशमुख गट रिचार्ज
अविनाश बाड-आटपाडी -विधानसभा निवडणुकीनंतर सुना-सुना दिसणारा आटपाडीतील देशमुखांचा वाडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांच्या विजयामुळे गुलालाने न्हाऊन निघाला संजूकाकांच्या निवडीमुळे देशमुख गटाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. आतापर्यत अनेक निवडणुकांमध्ये माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उमेदवारी केली आहे. पण त्यांच्या निवडणुकीची सारी सूत्रे पडद्यामागून उदयसिंह ऊर्फ संजूकाका हाताळत होते.
राजेंद्रअण्णांनी लढविलेली विधानसभेची निवडणूक असो अथवा अमरसिंह देशमुख यांनी तालुक्याला प्रथमच मिळवून दिलेल्या जिल्हा परिषदेच्या लाल दिव्याची गाडी असो या सर्व निवडणुका ज्यांनी पडद्याच्या पाठीमागून हाताळल्या, त्या संजूकाकांना जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने प्रथमच थेट संधी मिळाली.
विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यात एकूण ६८ विकास सोसायट्या आहेत. त्यापैकी ४५ संस्था देशमुख गटाच्या ताब्यात आहेत. पण उदयसिंह देशमुख यांना ५१ मते मिळाली म्हणजेच देशमुख गटाच्या राजकीय विरोधकांचीही सहा मते मिळाली. तालुक्यात कॉँग्रेसचे उमेदवार वसंतराव गायकवाड यांनी फक्त १६ मते मिळाली. मग देशमुखांना मिळालेली मते भाजपची की शिवसेनेची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीने विरोध केल्याने शिवसेनेची मते एकाच शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये असूनही मिळाली की नाही, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मिळविलेल्या या दमदार विजयामुळे देशमुख गटाच्या कार्यकर्त्यामध्ये आता उत्साह संचारल्याचे चित्र आहे. असे असले तरी आता माणगंगा सहकारी साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सूतगिरणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच होणार आहे.
या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपसह देशमुख गटाचे सगळे विरोेधक या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घेणार असून, त्याला देशमुख गटाचे हे ‘त्रिदेव’ कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देशमुखांचा ‘कार्यक्रम’ कधी थांबणार ?
वारा ज्या दिशेने वाहतो, त्या दिशेने वाहत जाणे सुकर असते, पण देशमुख गटाला हे आजपर्यंत जमलेले नाही. अनेक नेत्यांना, अनेक गटांना देशमुख गटाने अनेक निवडणुकीत मदत केली, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या या गटाचा लाभ घेणाऱ्या सर्वांनीच अनेकवेळा ‘कार्यक्रम’ केला आहे. तालुक्यातील, मतदारसंघातील आणि अगदी जिल्ह्यातील नेत्यांनीही या गटाचा वारंवार कार्यक्रम केला आहे. मात्र देशमुख गटाने आतापर्यंत तरी आपली राजकीय चाल सोडलेली नाही. हे चांगले का वाईट, हे येणारा काळच ठरवेल.