सांगलीमध्ये रूजतेय त्वचादानाची चळवळ...; वर्षभरात चार बालकांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:23 IST2020-01-11T23:20:51+5:302020-01-11T23:23:02+5:30
त्वचादानाबाबत गैरसमज --- मृत्यूपासून सहा तासांच्या आत त्वचा काढण्यात येते. त्वचा काढल्याने मृतदेह विद्रुप दिसतो असा एक गैरसमज नातेवाईकांमध्ये असतो, मात्र हे खरे नसून, केवळ मांडीवरील व पाठीवरीलच त्वचेचा पातळ पापुद्रा अत्याधुनिक मशिनरीव्दारे घेतला जातो. त्यामुळे मृतदेहाच्या पुढील विधीसाठी कोणतीही अडचण येत नाही.

सांगलीमध्ये रूजतेय त्वचादानाची चळवळ...; वर्षभरात चार बालकांना मिळाले जीवदान
शरद जाधव ।
सांगली : ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ अशी उक्ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी सध्या नेत्रदान, अवयवदानाची चळवळ मूळ धरत आहे. मृत्यूपश्चातही या नश्वर देहाचा उपयोग व्हावा, यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार असतानाच आता त्वचादानाची चळवळही वाढत आहे. सांगलीत रोटरीच्या माध्यमातून सुरू झालेल्या स्कीन बॅँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्वचेचे संकलन करून भाजलेल्या रुग्णांना जीवदान दिले जात आहे. वर्षभरात चार बालकांचे जीव यामुळे वाचले आहेत.
मानवी देहाचा मृत्यूनंतरही अनेकांना फायदा होत असतो. निर्धारित वेळेत अवयव प्रत्यारोपण केल्यास अनेकांना नवी दृष्टी, नवे आयुष्य मिळू शकते. याचधर्तीवर अवयवदानाची चळवळ वाढत आहे. मोठ्या शहरात ही चळवळ चांगलीच रूजली असली तरी सांगलीसारख्या ठिकाणी अद्यापही जनजागृती आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर त्वचादानाच्या चळवळीने सांगलीत मूळ धरले आहे.
त्वचादानाचे महत्त्व लक्षात घेतले तर, देशात दरवर्षी ७० लाख व्यक्ती भाजतात. त्यापैकी दीड लाखजण उपचाराअभावी मरण पावतात. यात ८० टक्के प्रमाण स्त्रियांचे असते.
विविध कारणांमुळे भाजलेल्या रुग्णांचा विचार केला तर, २० ते ३० टक्के भाजलेल्या रुग्णांच्याही जीवावर बेतू शकते. यात सर्वात महत्त्वाचे जंतू संसर्गामुळे मृत्यूची शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळीच त्वचेचे प्रत्यारोपण झाल्यास रुग्णाला नवीन आयुष्य मिळू शकते. हीच गरज ओळखून ‘रोटरी स्कीन बॅँक’स्थापण्यात आली आहे. जवळपास ६५ लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. रोटरीने सामाजिक बांधिलकी जपत सुरू केलेल्या या अभियानास प्रतिसादही समाधानकारक मिळत आहे. गेल्या वर्षभरात १० जणांनी त्वचादान केले आहे. तर चार रुग्णांवर त्वचा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. अविनाश पाटील आणि त्यांची टीम यासाठी कार्यरत आहे.
त्वचादानाची पध्दत
मृत्यूनंतर सहा तासांच्या आत हेल्पलाईनला फोन केल्यास त्वचा काढणारे तज्ज्ञ त्याठिकाणी पोहोचतात. साधारणपणे ४५ मिनिटात पाठ व मांडीवरील उपयुक्त त्वचा काढून घेण्यात येते. त्वचा काढलेल्या भागावर काळजीपूर्वक बॅँडेज करून मृतदेह परत दिला जातो. याच कालावधित नेत्रदानाचीही प्रक्रिया केली जाऊ शकते.
समाजात अद्यापही त्वचादानाबाबत गैरसमज आहेत. ते दूर होणे गरजेचे आहेत. त्वचेची प्रचंड प्रमाणात गरज असल्याने नातेवाईकांनीही त्वचादानासाठी पुढाकार घ्यावा व भाजलेल्या व्यक्तीस जीवनदान द्यावे.
- डॉ. दिलीप पटवर्धन, अध्यक्ष,
रोटरी त्वचापेढी समिती.