उपशिक्षणाधिकारी लोंढे निलंबित
By Admin | Updated: May 14, 2015 01:22 IST2015-05-14T01:21:54+5:302015-05-14T01:22:04+5:30
नियमबाह्य नियुक्ती : शिक्षकांच्या तक्रारींची दखल

उपशिक्षणाधिकारी लोंढे निलंबित
सांगली : शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्तीप्रकरणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लोंढे यांना शिक्षण आयुक्तांनी बुधवारी निलंबित केले. विशेष म्हणजे लोंढे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून, निवृत्तीला १८ दिवस राहिले असताना ही कारवाई झाल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.
लोंढे सध्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे उपशिक्षणाधिकारी असून, त्यांनी १ जून २०१० ते १३ आॅक्टोबर २०१० या कालावधित माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार असताना शिक्षकांना नियमबाह्य नेमणुका देऊन मागासवर्गीयांच्या जागेवर खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना मंजुरी दिली होती. तसेच काही शिक्षण संस्थांना शिक्षकांची पदे भरण्यासाठी नियमबाह्य मंजुरी दिली होती. मागासवर्गीयांसाठी आरक्षित पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना मंजुरी देणे, अनुकंपा तत्त्वावर नियमबाह्य शिक्षकांच्या नियुक्त्या करणे, राज्याबाहेरील शैक्षणिक पात्रता नसलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देणे, याबाबत काही शिक्षकांनी शासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कालावधित त्यांनी जिल्हा परिषदेत रोज हजेरी लावण्याची सूचनाही शासनाने दिली आहे. ते हजर राहिले नाहीत, तर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. याबद्दल प्राथमिक शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता, लोंढे गेल्या महिन्याभरापासून कार्यालयात हजर नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, लोंढे दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. (प्रतिनिधी)